लोणावळा : पवना धरणाच्या दुधिवरे या बॅक वॉटरमध्ये बुडून एका 62 वर्षीय शिक्षक पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली.
प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया (वय 62, रा. नेहरुनगर, कुर्ला, मुंबई) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. ते दुधिवरे गावाच्या हद्दीतील एका बंगल्यावर राहण्यासाठी आले होते. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते पोहण्यासाठी पवना धरणाच्या पाण्यात गेले असताना थोडय़ा अंतरावर पाण्यात दमछाक झाल्याने ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस हवालदार विजय गाले यांनी शिवदुर्गच्या पथकाला पाचारण केले. पथकातील महेश मसने, राजेंद्र कडु, प्रणय अंबुरे, सागर कुंभार, कपील दळवी, सतिष आहेर, अतुल लाड, सुनिल गायकवाड यांच्या पथकाने पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गाले पुढील कार्यवाही करत आहेत.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार