Tarun Bharat

कळंगूट डान्स बारमध्ये पोलिसांच्या ‘सेटिंग’द्वारे पर्यटकांची लूट

पर्यटकांचे व्हिडिओद्वारे केले जाते ब्लॅकमेलींग : पन्नास हजारांपासून लाखांची होते मागणी,हप्त्यांसाठी पोलीस, काही पंचसदस्यांचीही साथ

गिरीश मांद्रेकर /म्हापसा

कांदोळी, सिकेरी, कळंगूट ते बागा दरम्यान मोठय़ा प्रमाणात डान्सबार सुरु असून त्यात पर्यटकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याने कळंगूटसह गोव्याची मोठय़ा प्रमाणात बदनामी होत असल्याचे समोर आले आहे. या लुबाडणुकीत कळंगूट पोलिसांची साथ असून तक्रार देण्यास गेलेल्या पर्यटकांनाच हजारो प्रश्न विचारुन, घाबरवून पळवून लावण्याचे प्रकार पोलिस करत आहेत.

‘जीवाचा गोवा’ करण्यासाठी लाखो पर्यटक गोव्यातील समुद्रकिनाऱयांवर येत असतात. त्यातच कळंगूट समुद्रकिनारा जगभरात प्रसिद्ध आहे. देशी पर्यटकांचा जास्त भरणा कळंगूट येथेच असतो. त्यामुळे येथे हॉटेल, शॅक, डान्सबार यांची संख्याही खूप वाढली आहे. त्याचबरोबर गैरधंद्यांनाही उत आलेला आहे. वेश्या व्यवसाय, ड्रग्स, चोरी, धमकाविण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे. त्यामुळे गोव्याची बदनामी होत आहे.

पर्यटकांना ब्लॅकमेल करुन लुबाडण्याचा प्रकार

रात्रीच्या वेळी कळंगूट येथे फिरायला येणाऱया पर्यटकांना डान्सबारचे दलाल हेरतात आणि “लडकी चाहिये क्या’’? अशी विचारणा करतात. काही लोक त्यांच्या जाळ्य़ात फसतात व त्यांच्याबरोबर डान्स बारमध्ये जातात. दलाल डान्स बारमध्ये नेण्याचे आपले कमिशन म्हणून पर्यटकांकडून 1 हजार रु. घेऊन निघून जातो.  डान्स बारचे बाऊन्सर त्यांना आतमध्ये नेतात. तेथे डान्स फ्लोरवरील मुलींमध्ये नेऊन त्यांना सोडतात. त्या मुलींबरोबर डान्स करतानाचे पर्यटकांचे व्हिडिओ रेकॉडिंग बाउन्सर करुन घेतात. पर्यटक बाहेर आल्यावर त्यांना तो व्हिडिओ दाखवून 50 हजार ते लाखभर रुपये देण्याची मागणी करतात. न दिल्यास सोशलमीडिया किंवा त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबियांना व्हिडिओ दाखविण्याची धमकी देतात. याला घाबरुन हे पर्यटक त्यांना पैसे देऊन तेथून निघून जातात.

पोलिसांकडूनही निराशाच

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डान्स बारमध्ये लुबाडणूक झाल्यानंतर काही मोजकेच पर्यटक हिंमत दाखवून कळंगूट पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी जातात. मात्र पर्यटक येण्याअगोदरच डान्स बारच्या दलालांनी पोलिसांना सर्व घटना सांगून ‘सेटिंग’ करुन ठेवलेले असते. त्यामुळे पर्यटक तक्रार देण्यास येण्याच्यावेळी सेटींगवाले पोलीस कर्मचारी स्थानकात उपस्थित असतात व तक्रार देण्यास आलेल्या पर्यटकांनाच हजारो प्रश्न विचारुन भंडावून सोडतात. डान्सबारमध्ये का गेला होतात? मुलींसोबत तुम्ही काय केले? तुमच्या कुटुंबियांना बोलवा, तुम्ही तक्रार दाखल केल्यावर तुम्हाला केसच्यावेळी येता येईल का? उगाच तुमचीच बदनामी होईल? पैसे गेले तर जाऊ दे! असे सांगतात. पर्यटकांनी जास्त जोर धरल्यास डान्सबारच्या दलाला बोलावून अर्धे पैसे घेऊन ते पर्यटकांना परत केले जातात. मिळतात तेवढे घेऊन जा, अन्यथा तुमच्यावरच गुन्हे दाखल होतील अशी धमकी देऊन पोलीस स्थानकातून पिटाळून लावण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

काही शॅकमध्येही डान्सबार

सध्या किनारी भागात शॅकमध्येही संगीत रजनींचे आयोजन मोठय़ा प्रमाणात करण्यात येतात. त्यात डान्स करण्यासाठी मुलींना ठेवण्यात आले आहे. शिवाय पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी दलाल, बाउन्सरही ठेवण्यात येतात. प्रत्येक डान्सबारमध्ये 10 ते 15 बाउन्सर व मुली असतात. आता शॅकमध्येही 5 ते 10 बाउन्सर व मुली ठेवल्या जात आहेत. स्थानिक पंचायतीनुसार आपण फक्त रेस्टॉरंटसाठी परवानगी दिली असून तेथे सुरु असलेले डान्सबार वा संगीत रजनीचे प्रकार बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

काही पंचसदस्यांकडून हप्ता वसुली

दरम्यान, किनारी भागातील शॅकधारकांशी संपर्क साधला असता, काही पंचसदस्यांची माणसे रात्रीच्यावेळी हप्ता वसुलीसाठी येतात. मोठय़ा शॅकधारकांकडून 10 ते 15 हजार तर छोटय़ा शॅकधारकांकडून 3 ते 5 हजार हप्ता वसूल केला जातो. व्यवसाय सुरळीत चालावा, कोणताही अडथळा नको म्हणून हप्ता द्यावाच लागतो, असे त्यांनी सांगितले. शिवाय स्थानिक पोलीसही वसुलीसाठी येतात, असेही त्यांनी सांगितले. दोन्ही दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी पंचसदस्यांच्या मुलाला व अन्य एकाला मारहाण झाली ती का झाली याची माहिती मिळविल्यास खूप काही सत्य तुमच्या हाती लागेल, असेही सांगितले.

परप्रांतीय मुलींची मोठय़ा प्रमाणात वर्दळ

किनारी भागात रात्रीच्यावेळी परप्रांतीय मुलींची तोकडय़ा कपडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरु असते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या मुलींचा वापर केला जात आहे. त्यामुळे राज्याचे नाव देशभरात बदनाम होत असून सरकार, शासन याकडे लक्ष देणार आहे का? हा प्रश्न आता स्थानिक विचारु लागले आहेत.

पोलीस, पंचायत मंडळाने कडक धोरण स्वीकारावे : मायकल लोबो

स्थानिक आमदार तथा माजी मंत्री मायकल लोबो यांच्याशी संपर्क साधला असता, डान्सबार विरोधात कितीतरी वेळा पोलिसांकडे तक्रार केली मात्र ते गुन्हा नोंदवूनच घेत नाहीत. पोलिसांचाच आशीर्वाद या डान्सबारवाल्यांना आहे. दलाल, बाउन्सर पर्यटकांना विविध आमिषे दाखवून डान्सबारमध्ये नेतात. त्यांचे व्हिडियो काढून ब्लॅकमेल करणे, एटीएम कार्ड हिसकावून घेणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. पोलिसांनी या विरोधात कडक धोरण स्वीकारुन डान्सबारविरोधात एफआयआर नोंद केल्यास हे प्रकार बंद होतील. तसेच पंचायतीकडूनही यांना परवानगी मिळते त्यामुळे दलालांची संख्या वाढली आहे. सरकार व पंचायतींनी एकत्रित काम केल्यास कळंगूटमधील बेकायदेशीर धंदे बंद होतील.

आजपासून बेकायदेशीर डान्सबारांवर कारवाई : सरपंच सिक्वेरा

दोन दिवसांपूर्वी परप्रांतिय दलाल व बाउन्सरांकडून स्थानिक पंचसदस्याच्या मुलाला मारहाण करण्यात आली तसेच पर्यटकांना लुबडण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने कळंगूट पंचायतीने हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. सोमवारपासून कळंगूट ते बागादरम्यान चालणारे बेकायदेशीर डान्सबार व शॅक डान्स पूर्णतः बंद करण्याचा निर्णय पंचायतीने घेतल्याची माहिती सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याबाबत कळंगूट पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व याप्रकरणात गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून किनारी भागात चालणाऱया बेकायदेशीर प्रकारांवर आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केल्याची माहितीही सरपंच सिक्वेरा यांनी दिली.

Related Stories

फातोर्डा स्टेडियमसाठी सामुग्री आणलेल्या ट्रक चालकाचा मृत्यू

Patil_p

विठ्ठलापूर सांखळीत ‘उसळ उत्सव’ सुरु

Amit Kulkarni

मंत्री निळकंठ हळर्णकर वास्को भेटीत पशुसंवर्धन, मच्छिमारी संबंधीत विषयांवर नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या

Amit Kulkarni

तरवळेला नमवून एमएलटीला मडकई लेदरबॉल क्रिकेटचे विजेतेपद

Amit Kulkarni

सर्वच क्षेत्रात गोव्याला आत्मनिर्भर बनविण्याची प्रक्रिया सुरू

Patil_p

रेजिनाल्डसारख्या खोटारडय़ांना थारा देऊ नका

Amit Kulkarni