सीआरझेड बांधकाम प्रतिबंध क्षेत्रात बेकायदा बांधकाम
प्रतिनिधी /पणजी
कांदोळी येथील टॉय बीच क्लब हॉटेल पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून सीआरझेड बांधकाम प्रतिबंध क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी नुकसान भरपाई का वसूल केली जाऊ नये, अशी नोटीस सदर हॉटेल व्यवस्थापनाला पाठवली होती.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला कांदोळी येथील टॉय बीच क्लब या हॉटेलात बेकायदेशीररित्या रेव पार्टी आयोजित केल्याचे नमूद करून रोशन माथियास यांनी जनहित याचिका सादर केली होती. उच्च न्यायालयाने दखल घेऊन तेव्हा नोटीस बजावली तेव्हा सदर टॉय बीच क्लबमध्ये नववर्षाची पार्टी होणार नसून कोणतीही तयारी नसल्याचे उत्तर प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात आले होते. याचिकादाराने पार्टीच्या तयारीचे फोटो उच्च न्यायालयाला सादर करून सदर पार्टीच्या आयोजनावर स्थगिती मिळवली व तेथील सामान जप्त करण्याचा आदेश दिला.
सदर हॉटेल बेकायदेशीररित्या बांधल्याचे स्पष्ट होताच आता ते पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला असून ते पाडल्यानंतर आलेल्या एकूण खर्चाचा तपशील सादर करण्यात यावा, असा आदेश किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाला दिला आहे. या बांधकामामुळे पर्यावरणाची किती हानी झाली त्याचा तपशील उच्च न्यायालयाला सादर करावा, असे या अंतरिम आदेशात स्पष्ट करून सदर हॉटेलला नोटीस बजावून नुकसान भरपाई का वसूल केली जाऊ नये, असा सवाल केला आहे. पुढील सुनावणी 4 मे रोजी ठेवण्यात आली आहे.