खोदलेले खड्डे, बेशिस्त पार्किंग, ‘इफ्फी’ आयोजनाचा वाहतुकीवर ताण
प्रतिनिधी /पणजी
राजधानी ही मुळातच देखणी असल्यामुळे या शहरात देश विदेशातील पर्यटक भेट देतात. सध्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असल्यामुळे त्यात आणखीनच वाढ झाली आहे. पणजी शहरात महत्त्वाच्या ठिकठिकाणी ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत कामे सुरू असल्यामुळे अनेक रस्त्यांच्या ठिकाणी खोदकाम केलेले आहे. शिवाय चालकही बेशिस्त पार्किंग करीत असल्याने ऐन ‘इफ्फी’ महोत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. तसेच वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरात सकाळच्या वेळी स्थानिकांना आपली वाहने लावण्यास थोडीफार जागा मिळत असली तरी सकाळी 10 वाजल्यानंतर मात्र उलट परिस्थिती असते. शहरात खरेदीसाठी येणाऱयांना दुचाकी लावण्यासही जागा मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याठिकाणी पार्किंगचा बोजवारा
शहरातील मुख्य मार्केट परिसर, 18 जून रस्ता, पणजी चर्च परिसर, मिरामार, कला अकादमी, सांतईनेज, सरकार भवनसमोरील रस्ता आदी ठिकाणी दुचाकी पार्किंग करण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यामुळे वाहने लावावी तरी कुठे ? असा प्रश्न दुचाकी चालकांना पडला आहे.
‘इफ्फी’मुळे गर्दी वाढली
सध्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू असल्याने शहरात फेरफटका मारणाऱयांचीही संख्या वाढली आहे. केवळ विद्युत रोषणाई पाहण्यासाठी, हातगाडय़ांच्या ठिकाणी खाण्यापिण्याच्या निमित्ताने लोक येत असल्यानेही शहरातील पार्किंग ‘फुल्ल’ होत आहे. काही नागरिक चार चाकी वाहने शहरात घेऊन येत असल्याने वाहतूक कोंडी व पार्किंग समस्या निर्माण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामुळे वाहतुकीवर ताण येऊ नये यासाठी उत्तर गोव्यातून सुमारे 140 अतिरिक्त वाहतूक पोलीस पणजी शहरातील विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. कला अकादमी, बांदोडकर मैदान, इएसजी कडील मार्ग, जॉगर्स पार्क आल्तिनो या ठिकाणी लोकांना वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बॅडन डिसोझा-वाहतूक पोलीस निरीक्षक पणजी