कामावर पोहोचण्यासाठी वाहनचालकांना विलंब : रेल्वेगेट दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी/बेळगाव
टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेटनजीक वाहनांची कोंडी ही नागरिकांना नेहमीचीच डोकेदुखी ठरत आहे. मंगळवारी सकाळी येथील रेल्वे फाटकाचे एका बाजूचे गेट उघडले तर दुसऱया बाजूचे गेट तसेच राहिल्याने बराचवेळ वाहतूक कोंडी झाली होती. सकाळच्या सुमारास वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाल्याने कामावर पोहोचण्यासाठी वाहनचालकांना विलंब झाला.
रेल्वे मार्गावर दुपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. दुसरे रेल्वेगेट येथे नव्याने रेल्वेफाटक बसविण्यात आले आहे. मात्र, हे रेल्वेफाटक सिग्नल सिस्टमवर अवलंबून असल्याने जापर्यंत रेल्वेकडून सिग्नल मिळत नाही तोपर्यंत रेल्वेफाटक उघडत नाही. मागील महिन्याभरात अनेकवेळा अशा प्रकारे रेल्वेगेट उघडले नसल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार घडले आहेत. नवीन गेट बसविल्यापासून या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे रेल्वेगेटच्या दोन्ही बाजुंनी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळे 15 मिनिटे रेल्वेगेट बंद करण्यात आले होते. रेल्वे निघून गेल्यानंतर गेट उघडण्यात आले. परंतु एकाच बाजूचे गेट खुले झाले तर दुसऱया बाजूचे रेल्वेगेट खुले होत नसल्याचे दिसून आले.
गेटमनने प्रयत्न करूनही रेल्वेगेट उघडत नसल्यामुळे नागरिक गेटच्या खालून वाहने दुसऱया बाजूला घेऊन जात होते. यामुळे काँग्रेसरोड तसेच हेरवाडकर स्कूल रोडवर प्रचंड वाहतूक केंडी झाली होती. यामुळे रेल्वेगेटची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.