प्रतिनिधी / शिरोडा
बायथाखोल बोरी येथे फोंडा मडगाव महामार्गावर वृक्ष कोसळल्याने संपूर्ण वाहतूक तासभर ठप्प झाली. गुरुवारी सकाळी 11 वा. सुमारास रस्त्याच्या बाजूचे हे जंगली झाड महामार्गाच्या मधोमध कोसळले. सुदैवाने यावेळी रस्त्यावर एकही वाहन नव्हते. मात्र मडगाव फोंडा महामार्गाला जोडून असलेल्या वास्को, सावर्डे या मुख्य शहराकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे रखडून पडली.
या महामार्गावर प्रवासी वाहनांसह अन्य अवडज वाहनांची मोठय़ा प्रमाणात रहदारी सुरु असते. फोंडा तालुक्यातून वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये जाणारे कामगार तसेच दाबोळी विमातळ, मडगाव रेल्वे स्थानकावर जाणारे प्रवासी याच मार्गाचा वापर करतात. सकाळी रहदारीच्यावेळी हे झाड पडल्याने फोंडा व बोरीच्या बाजूने साधारण 1 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागून राहिल्या. झाड कोसळताना बाजूच्या वीज तारांवर कोसळले व एक खांब अर्ध्यावर कोलमडून राहिला. फोंडा अग्नीशामक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तातडीने झाड हटविले व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. तोपर्यंत साधारण तासभराहून अधिक वेळ वाहतूक रखडून राहिली.