वैभववाडी/प्रतिनिधी-
संततधार कोसळणाऱ्या पावसाने करूळ घाटात दोन ठिकाणी दरड कोसल्याने हा मार्ग वाहतुकीस ठप्प झाला आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट व भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे.शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जेसीबी मशीनच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू असून उशिरापर्यंत हा घाट मार्ग ठप्प होता.
गेले काही दिवस संततधार पाऊस पडत आहे. पावसाळ्यात धोकादायक ठरणारे घाटमार्ग अद्यापही सुस्थितीत होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी गगनबावडा पासून ४ कि.मी. अंतरावर दोन ठिकाणी दरड कोसळली आहे. कोसळलेल्या दरडीत माती व भलेमोठे दगड असल्याने घाटमार्गातील रस्ता पूर्णतः व्यापून गेला आहे. त्यामुळे घाटातून ये जा करणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
सायंकाळी पोलीस निरीक्षक अमित यादव हे घाट मार्गात गस्त घालीत असता काही अंतरावर ही दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक करूळ चेक नाका येथे तर वैभववाडी कडे येणारी वाहतूक गगनबावडा येथे थांबविण्यात आली. घाटमार्गात दरडी कोसळल्यास किंव्हा अडथळे निर्माण झाल्यास तातडीने उपाययोजना करता यावी यासाठी घाटमार्गात जेसीबी मशीन दक्ष ठेवण्यात आली आहे. कोसळलेल्या दरडी दोन जेसीबी मशीनच्या साहाय्याने हटविण्याचे काम सुरू आहे.
कोसळलेल्या दरडीत मोठे दगड असल्याने ते हटविण्यासाठी किमान दोन तासांचा कालावधी लागणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले. या मार्गावरील अवजड वाहतूक फोंडाघाट मार्गे तर अन्य छोटी वाहने भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे.