बसवन कुडचीनजीकच्या बळ्ळारी नाल्याजवळील प्रकार
वार्ताहर /सांबरा
बसवन कुडचीनजीकच्या बळ्ळारी नाल्याजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युतभारित तारेच्या जोडणीचे काम हेस्कॉमने मंगळवारी सायंकाळी हाती घेतल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होता.
त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बसवन कुडचीनजीकच्या बळ्ळारी नाल्याच्या शेजारून गेलेली उच्च दाबाची विद्युतभारित तार सोमवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक तुटून रस्त्यावर पडली. सदर प्रकार तेथून जाणाऱया काही वाहनचालकांनी दूरध्वनीद्वारे हेस्कॉमला कळविला. त्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला. हेस्कॉमने दुसऱया दिवशी दिवसभर दुरुस्तीचे काम केल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास उच्च दाबाच्या तार जोडणीचे काम हाती घेतले.
सायंकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावरील रहदारी पूर्णपणे थांबविण्यात आली. यामुळे बेळगाव-बागलकोट महामार्गावर एकच गर्दी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे तासभर वाहनचालकांना रस्त्यावरच ताटकळावे लागले. विद्युत जोडणीचे काम झाल्यानंतर रस्ता खुला करण्यात आला. या रस्त्यावर सायंकाळच्या वेळी कामावरून घरी जाणाऱयांची संख्या जास्त असते. त्यामुळे रस्ता खुला होण्यास बराच उशीर झाला. हेस्कॉम व रहदारी पोलिसांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी परिश्रम घेतले.