बऱयाच मार्गांवर मोठय़ा वाहनांना बंदी घातल्याने वाहनचालक त्रस्त
प्रतिनिधी/बेळगाव
ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी रविवारी शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला होता. यामुळे बऱयाचशा मार्गांवर मोठय़ा वाहनांना बंदी घालण्यात आली होती. यामुळे इतर मार्गांवर वाहतुकीची कोंडी होत होती. शहराचे प्रमुख मार्ग बंद असल्यामुळे लहान मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते.
संकेश्वर, चिकोडी, कोल्हापूरकडे जाणारी वाहने चन्नम्मा सर्कल मार्गे वळविण्यात आली. तर गोव्याला जाणारी वाहने बॉक्साईट रोड मार्गे वळविण्यात आली. शहरात वाहनांसाठी बंदी घालण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक वळविण्यात आली होती. परंतु यामुळे शहरातील इतर मार्गांवर भार पडला.
रविवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत होते. परंतु वाहतूक कोंडीमुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.