नीना गुप्ता अन् अनुपम खेर यांची जोडी
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांचा आगामी चित्रपट ‘शिवशास्त्राr बलबोआ’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्यात कमालीचे बाँडिंग दिसून येत आहे. या चित्रपटात दोन व्यक्तींची कहाणी दर्शविण्यात आली आहे, हे दोघेही वेगवेगळय़ा प्रकारे अमेरिकेत भेटत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. चित्रपटात अनुपम खेर हे एका निवृत्त बॉक्सिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. तर नीना गुप्ता या एक बार चालविणाऱया महिलेची भूमिका साकारत आहेत.
चित्रपटात अनुपम खेर, नीना गुप्ता यांच्यासह जुगल हंसराज, नर्गिस फाकरी आणि शारिब हाशमी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अजय वेणुगोपालन यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती किशोर वरिथ यांनी केली आहे. शिवशास्त्राr बलबोआ हा चित्रपट 10 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अनुपम खेर आणि नीना गुप्ता अलिकडेच सूरज बडजात्या यांचा चित्रपट ‘उंचाई’मध्ये एकत्र दिसून आले होते. चित्रपटात नीना यांनी बोमन इराणी यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर अनुपम खेर हे लवकरच विवेक अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि कंगना रनौतचा चित्रपट ‘इमरजेंसी’मध्ये दिसून येणार आहेत.