दुसऱया रेल्वेगेटवरील प्रकार : काँग्रेस रोडच्या दोन्ही बाजूंनी ये-जा करणारी वाहतूकही ठप्प
प्रतिनिधी /बेळगाव
आठवडय़ाचा पहिलाच दिवस असल्याने शाळा, कार्यालय, उद्योगांवर जाणाऱयांची धडपड सुरू असताना दुसरे रेल्वेगेटनजीक अचानक रेल्वे थांबली. बराच उशीर रेल्वे पुढे सरकली नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांची प्रचंड कोंडी झाली. काँग्रेस रोडवर तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रेल्वे का थांबली? याचे कारण अस्पष्ट असले तरी यामुळे नागरिकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.
सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास बेंगळूरहून बेळगावला येणारी चन्नम्मा एक्स्प्रेस दुसरे रेल्वेगेटनजीक थांबली. बराच वेळ झाला तरी रेल्वे पुढे निघत नसल्याने काँग्रेस रोड व हेरवाडकर स्कूल रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. प्रत्येकालाच वेळ होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता. काहींनी तर वाहने बाजूला काढत गोगटे सर्कलमार्गे गोवावेस येथे येणे पसंत केले. यामुळे शाळा तसेच कामावर पोहोचण्यासाठी विलंब झाला.
महिन्याभरात दुसरी घटना
पंधरा दिवसांपूर्वी एक मालवाहू रेल्वे दुसरे रेल्वेगेटनजीक थांबली होती. तब्बल तासभर ही रेल्वे थांबल्यामुळे रेल्वेगेट ओलांडून जाणाऱया प्रवाशांचे पुरते हाल झाले. अखेर नागरिकांना गोगटे सर्कलमार्गे रस्त्याच्या दुसऱया बाजूला जावे लागले. सोमवारीदेखील असाच प्रकार घडला. सिग्नल मिळत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत असले तरी यामुळे नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
रेल्वे विभागाने खबरदारी घेणे गरजेचे
दुसरे रेल्वेगेट येथे रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी वाहनचालक थांबले होते. परंतु रेल्वे पुढे न गेल्याने वाहनांची संख्या वाढत गेली. यामुळे काँग्रेस रोडच्या दोन्ही बाजूंनी ये-जा करणारी वाहतूकही ठप्प झाली. काँग्रेस रोडमार्गे औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱया कामगारांनाही या सर्वांचा फटका बसला. त्यामुळे असे प्रकार पुढे होऊ नयेत, यासाठी रेल्वे विभागाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.