विधानसभा अधिवेशन 11 जुलैपासून
प्रतिनिधी /पणजी
राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 11 जुलै पासून प्रारंभ होणार असून तत्पूर्वी विधानसभेतील नव्या सदस्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर 19 नवीन चेहरे विधानसभेत दाखल झाले आहेत. या आमदारांना विधानसभा कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याची जाणीव झाली. त्यातूनच प्रशिक्षणाची योजना आखण्यात आली, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली. पुणेस्थित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेतर्फे या आमदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दि. 7 आणि 8 जून असे दोन दिवस हे विशेष प्रशिक्षण असेल, असे तवडकर म्हणाले.
दरम्यान विधानसभा अधिवेशनाचा कालावधी किती दिवसांचा असेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरीही ते प्रदीर्घ काळ चालेल हे निश्चित असे तवडकर यांनी सांगितले. विद्यमान विधानसभेत 40 मधील 19 आमदार हे नवे चेहरे असल्यामुळे त्यांना बोलण्यासाठी सभागृहात योग्य वेळ मिळाली पाहिजे. त्यासाठीच अधिवेशन प्रदीर्घ काळ चालणारेच असावे, असा आमचा विचार आहे, असे सांगून अधिवेशनाचा कालावधी लवकरच निश्चित करण्यात येईल असे सभापती तवडकर यांनी सांगितले.