मे महिन्यात मागील विक्रम मोडीत : व्यवहारांच्या संख्येत मोठी वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात युपीआयद्वारे होणाऱया व्यवहारांच्या संख्येत मोठी वृद्धी दिसून आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात युपीआय व्यवहाराचा एकूण आकडा 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिला आहे. हा आकडा आतापर्यंतचा उच्चांकी ठरला आहे.
एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) एकूण 5.95 अब्ज व्यवहार करण्यात आले आहेत. या व्यवहारांमधील एकूण रक्कम 10.41 लाख कोटी रुपये इतकी आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात 5.58 अब्ज युपीआय व्यवहार करण्यात आले होते आणि देवाणघेवाणीची रक्कम 9.83 लाख कोटी रुपये राहिली होती.
मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत व्यवहारांची संख्या दुप्पटीपेक्षा अधिक झाली आहे. मे 2021 मध्ये युपीआय व्यवहारांची संख्या 2.54 अब्ज राहिली होती. मासिक आधारावर चालू वर्षातील मे महिन्यात व्यवहारांच्या संख्येत 7 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. तर रक्कम 6 टक्क्यांनी वाढली आहे.
कोरोना महामारीच्या संकटकाळात लोकांसाठी डिजिटलायझेशन अत्यंत लाभदायक ठरले आहे. याचमुळे मागील दोन वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट अत्यंत वेगाने वाढले आहे. लोकांनी आता युपीआय पेमेंटला अधिक प्राधान्य दिले आहे. या कालावधीत अनेक खासगी कंपन्यांच्या युपीआय ऍपचा वापर वाढला आहे. युपीआय पेमेंट सर्वात वेगवान आणि सुरक्षित मानले जाते. कुटल्याही युपीआय पेमेंट ऍपद्वारे रक्कम हस्तांतरित करता येते. याकरता केवळ मोबाइल असणे आवश्यक आहे.