नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विविध उच्च न्यायालयांच्या सहा न्यायाधीशांच्या बदल्या करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केंद्र सरकारला केली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा, न्या. यु. यु. लळित आणि न्या. ए. एम. खानविलकर यांचा समावेश या न्यायवृंदात आहे. या न्यायवृंदावर न्यायाधीशांच्या बदल्यांचे उत्तरदायित्व आहे.
न्यायवृंदाच्या सूचनेनुसार पुरुषेंद्रकुमार गौरव यांची बदली मध्यप्रदेश उच्च न्यायालयातून दिल्ली उच्च न्यायालयात, न्या. अहसाउद्दिन अमानुल्ला यांची बदली आंध्रप्रदेश उच्च न्यायालयातून पाटणा उच्च न्यायालयात, न्या. चित्तरंजन दास यांची बदली ओडिशा उच्च न्यायालयातून कलकत्ता उच्च न्यायालयात, न्या. शुभाशीष तालपात्रा यांची बदली त्रिपुरा उच्च न्यायालयातून ओडिशा उच्च न्यायालयात, न्या. लाऊनसुंगकुम जमीर यांची बदली मणिपूर उच्च न्यायालयातून गुवाहाटी उच्च न्यायालयात तर न्या. धीरजसिंग ठाकूर यांची बदली जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयातून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात येणार आहे.