गोवा माईल्सच्या काऊन्टर प्रश्नी टॅक्सी व्यवसायीकांना केल्या सुचना
प्रतिनिधी /वास्को
दाबोळी विमानतळावर पुढील काही दिवसांत गोवा माईल्सचा टॅक्सी काऊन्टर उपलब्ध होणार असल्याने वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी बुधवारी विमानतळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शासकीय अधिकारी उपस्थित होते. मंत्री गुदिन्हो यांनी यावेळी काळय़ा पिवळय़ा टॅक्सी संघटनेच्या नेत्यांसमवेत चर्चाही केली. दाबोळी विमानतळ मोपा विमानतळाच्या तुलनेत टॅक्सी सेवेत कमी पडू नये, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी टॅक्सी चालकांना केले आहे.
गोवा माईल्स या ऍपवर आधारित टॅक्सी सेवेला यापूर्वी दाबोळी विमानतळावर काऊन्टर देण्यात आला होता. मात्र, मध्यंतरी हा काऊन्टर बंद करण्यात आला. आता पुढील काही दिवसांत पुन्हा गोवा माईल्सचा काऊन्टर विमानतळावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विमानतळावरील युनायटेड टॅक्सीमेन्स युनियनच्या काळय़ा पिवळय़ा टॅक्सी व्यवसायीकांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. मंगळवारी संध्याकाळी या टॅक्सी चालकांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची भेट घेतली व या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली. आपल्या अडचणीही त्यांनी मंत्र्यासमोर मांडल्या. यावेळी मंत्र्यांनी त्यांना या प्रश्नावर समजावले व काही अडचणी असल्यास दूर करण्याचे आश्वासनही दिले.
काल बुधवारी मंत्री माविन गुदिन्हो दाबोळी विमानतळावर गोवा माईल्सचा काऊन्टर येणार असल्याने विमानतळावर पाहणीसाठी दाखल झाले होते. त्यांच्यासोबत यावेळी वाहतूक संचालक, दाबोळी विमानतळ संचालक, कदंब महामंडळाचे अधिकारी, पोलीस, आरटीओ व इतर संबंधी अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱयांशी तसेच काळय़ा पिवळय़ा टॅक्सी युनियनच्या नेत्यांशीही त्यांनी पुन्हा चर्चा केली.
मोपा विमानतळ सुरू होणार आहे. त्या ठिकाणी ऍप आधारित टॅक्सी सेवा असणार आहे. दाबोळी विमानतळावरही ही सेवा असायला हवी. ही आधुनिक सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध व्हायला हवी. मोपाच्या तुलनेत दाबोळीवर असुविधा दिसून आल्यास त्याचा परिणाम दाबोळीतील व्यावसायावर होईल. त्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा देण्यावर सर्वांनी भर द्यायला हवा, अशी सूचना मंत्री गुदिन्हो यांनी यावेळी टॅक्सी चालकांना केली. या विमानतळावर गोवा माईल्स आणि टॅक्सी युनियनच्या काऊन्टरची योग्य व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी म्हटले आहे.