सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील प्रकार : नागरिकांतून संताप
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे रुग्णांसाठी स्ट्रेचर उपलब्ध होत नाही, तर दुसरीकडे स्ट्रेचरवरून दगड वाहून नेले जात असल्याचे चित्र सोमवारी सकाळी पहायला मिळाले. बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरात हा प्रकार पाहून उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. रुग्णांना ने-आण करण्यासाठी असणारा स्ट्रेचर दगड वाहतुकीसाठी वापरणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
वैद्यकीय साहित्याचा गैरवापर हा विषय काही नवीन नाही. यापूर्वी अनेकवेळा वैद्यकीय साहित्य इतर ठिकाणी वापरणे, फेकून देणे, वापराविना पडून राहणे असे प्रकार घडले आहेत. परंतु बऱयाचवेळा स्ट्रेचर उपलब्ध होत नसल्याने चादरात गुंडाळून रुग्णांची ने-आण करण्याची वेळ रुग्णालयात येते. बेळगावच्या सरकारी रुग्णालयात तर वेळच्या वेळी साहित्य उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असते. लाखो रुपये खर्च करून सरकारकडून आलेल्या वैद्यकीय साहित्याचा गैरवापर केला जात असल्याचे प्रकार वरचेवर घडत आहेत.
संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
बिम्स इमारतीत ब्लड बँकेशेजारी बांधकाम सुरू आहे. जुन्या भिंतींचे फोडलेले साहित्य इतरत्र टाकले जात आहे. परंतु सोमवारी सकाळी यासाठी चक्क स्ट्रेचरचा वापर केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. रुग्णांसाठी देण्यात आलेले स्ट्रेचर कामगारांकडे आले कसे? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.