निर्धार पाहून चकित व्हाल
सोशल मीडियाचे जग हिंमत, निर्धाराचे उदाहरण मांडणाऱया लोकांच्या कहाण्यांनी ओतप्रोत भरलेले आहे. सोशल मीडिया केवळ मनोरंजन नव्हे तर प्रेरणात्मक काम देखील उत्तमप्रकारे करू शकते. आता एका नव्या व्हिडिओत सायकलने जगभ्रमंती करण्यासाठी निघालेल्या व्यक्तीचा निर्धार पाहून सर्वजण प्रभावित झाले आहेत.
या युवकाला एक हात तसेच एक पाय नाही, परंतु हा युवक स्वतःची हिंमत आणि निर्धाराच्या बळावर जगभ्रमंती करण्यासाठी बाहेर पडला आहे आणि तो देखील सायकलने. रस्त्यावर एका पायाने पॅडल मारणाऱया युवकाच्या या व्हिडिओला 7 लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
व्हायरल व्हिडिओत एक दिव्यांग युवक सायकलने जगाची सैर करण्यासाठी निघालेला दिसून येतो. रस्त्यांवर एका पायाने सायकलचा पॅडल मारून वेगाने पुढे जात असताना पाहून लोक थक्कच झाले. त्याची हिंमत आणि निर्धार सलाम करावा असाच होता. या व्हिडिओत सायकल चालविणाऱया दिव्यांग युवकाला पाहून शेजारून जात असलेल्या बाइकस्वार महिलेने त्याच्या सायकलच्या बास्केटमध्ये काही खाद्यपदार्थ मदतीदाखल ठेवले होते. महिलेची ही कृती देखील पाहणाऱयांना अत्यंत प्रेरित करणारी होती.
या व्हिडिओने प्रत्येकाला अत्यंत प्रभावित केले आहे. शारीरिक आणि मानसिक दृष्टय़ा पूर्णपणे तंदुरुस्त असूनही धाडसाअभावी स्वतःच्या इच्छा पूर्ण करू शकत नाहीत, अशा लोकांकरता हा युवक उदाहरण ठरला आहे. या युवकाने स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करत जगाची सैर करण्याचा निर्णय घेतला आहे. एका पायाने सायकल चालविणे कुणासाठीच सोपे नाही. याचमुळे हा युवक लोकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरत आहे.