स्लीपवॉकिंगचे अनोखे प्रकरण
झोपेत चालण्याची सवय असलेल्या लोकांबद्दल बऱ्याच जणांनी माहिती असते. परंतु झोपेत माणूस किती अंतर चालू शकतो याचा अंदाज लावणे अत्यंत अवघड आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने 1987 मध्ये झोपेत चालण्याशी संबंधित झालेला किस्सा शेअर केला आहे.
स्लीपवॉकिंग ही एक वैद्यकीय अवस्था असून यात माणसाला झोपेत चालण्याची सवय असते. 6 एप्रिल 1987 रोजी मायकल डिक्सन नावाचा एक 11 वर्षीय मुलगा अमेरिकेत इंडियानाच्या पेरूमध्ये एका रेल्वेमार्गावर अनवाणी पायांनी आढळून आला होता. त्याने नाइट सूट परिधान केला होता. या मुलाला पाहून रेल्वे चालक दलाने पोलिसांना बोलाविले होते. पोलिसांनी मायकल डिक्सनला तू कुठे राहतोस हे विचारले होते. मायकल हा इंडियानाच्या डेनविले येथील रहिवासी होता आणि हे ठिकाण पेरूपासून 160 किलोमीटर अंतरावर होते. झोपेत चालण्याच्या घटनेच्या रात्री मायकल अखेरचा बेडवर झोपलेला पाहिला गेला होता. परंतु अचानक इंडियाना पोलिसांनी फोन करून त्याच्या आईला मायकल विचित्र अवस्थेत पेरू येथे आढळून आल्याचे कळविले होते.
झोपेत कसा पोहोचला?
डिक्सन झोपेत इतक्या अंतरावर कसा पोहोचला हा प्रश्न उपस्थित झाला. त्याच्या घरानजीकच्या रेल्वेस्थानकावरून एका मालगाडीत चढला आणि पेरू येथे पोहोचला असावा असे मानले गेले. रेल्वेत चढण्याविषयी मला काहीच आठवत नसल्याचे त्याने सांगितले होते. परंतु त्याच्या पायांना ईजा झाली होती.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
ही घटना प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यावर चर्चेत राहिली होती. मायकल डिक्सनच्या या स्लीपवॉकिंगला दोन वर्षांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळाले होते. मायकल नेहमीच झोपेत चालायचा, परंतु यापूर्वी तो कधीच घराबाहेर गेला नव्हता असे त्याच्या आईने म्हटले होते.