कॅम्पची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार
प्रतिनिधी/ बेळगाव
ऑल इंडिया एनसीसी ट्रेकिंग कॅम्पला नुकतीच सुरूवात झाली. 15 ते 22 डिसेंबर दरम्यान हा कॅम्प घेतला जात आहे. एनसीसीचे ग्रुप कमांडर कर्नल के. श्रीनिवास यांच्या हस्ते कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी एनसीसी छात्रांना ट्रेकसाठी पाठविण्यात आले.
आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पाँडेचेरी, केरळ, लक्षद्वीप, गुजरात, कर्नाटक, गोवा यासह 7 राज्ये व 2 केंद्रशासीत प्रदेश येथील 510 छात्रांचा या कॅम्पमध्ये सहभाग आहे. बसुर्ते, बेळगुंदी, देवरवाडी, हंगरगा, महिपाळगड या भागामध्ये ट्रेकिंग करण्यात आले. शैक्षणिक दौऱ्याचा भाग म्हणून बेळगावमध्ये कमांडो विंग, एमएलआयआरसी व येळ्ळूर येथील राजहंसगड येथे भेट दिली जाणार आहे.
या शिबिराची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. छात्रांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासोबतच साहसी भावना निर्माण करणे, सहनशक्ती, सांघिक भावना, पर्यावरणीय समतोल आणि प्राचीन वास्तूंचा अभ्यास असा या शिबिराचा उद्देश असणार आहे. यावेळी कमांडिंग ऑफिसर एस. दर्शन, विंग कमांडर दीपक बल्हारा, ले. कर्नल सी. बी. नंदकुमार, सुभेदार मेजर निलेश देसाई यांच्यासह इतर उपस्थित होते.