Tarun Bharat

आश्रय घरकुलात अतिक्रमण; माहितीसाठी सर्वेक्षण

महानगरपालिकेने बांधून दिलेल्या घरांचा दुरूपयोग होत असल्याचे निदर्शनास, 39 घरांमध्ये अतिक्रमण

प्रतिनिधी /बेळगाव

गरजुंना आश्रय योजनेंतर्गत घरे देण्याची योजना महापालिकेच्या वतीने राबविण्यात आली आहे. मात्र महापालिकेने बांधुन दिलेल्या घरांचा दुरूपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. श्रीनगर येथील 272 पैकी 39 घरांमध्ये अतिक्रमण झाले असल्याने लाभार्थींची माहिती घेण्यासाठी मंगळवारी आश्रय वसाहतीमधील लाभार्थींचे सर्वेक्षण करण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने राबविण्यात आली. पण सर्वेक्षणास आक्षेप घेऊन अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण मनपाच्या अधिकाऱयांनी सर्वेक्षण केले.

शहरात रस्त्याशेजारी, ब्रिजखाली व खुल्या जागेत झोपडी बांधुन राहणाऱया नागरिकांसाठी महापालिकेच्या वतीने आश्रय योजनेंतर्गत घरे बांधुन देण्यात आली आहेत. वंटमुरी आश्रय कॉलनी, कणबर्गी, श्रीनगर, अलारवाड, सहय़ाद्री नगर अशा विविध ठिकाणी आश्रय वसाहत निर्माण करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी 2030 घरे लाभार्थ्यांना बांधून देण्यात आली आहेत. तसेच लाभार्थ्यांना घरे दिल्यानंतर हक्कपत्र देखील सोपविण्यात आले होते. पण काही नागरिकांनी अतिक्रमण करून घरांचा ताबा घेतला आहे. या घरांमध्ये अनधिकृतरित्या ताबा मिळवून वास्तव्य करण्यात आल्याची माहिती महापालिकेला उपलब्ध झाली आहे.

श्रीनगर परिसरातील बहुमजली इमारतींचे बांधकाम करून 272 घरे निर्माण करण्यात आली होती. यापैकी 233 घरांच्या हक्कापत्रांचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले होते. पण उर्वरीत 39 घरांमध्ये अतिक्रमण झाले आहे. घरामध्ये अनधिकृतरित्या अतिक्रमण केल्याबद्दल यापूर्वी महापालिकेच्या आश्रय विभागाने नोटीस बजावून घरे रिकामी करण्याची सूचना केली होती. मात्र याची दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे श्रीनगर आश्रय कॉलनीतील लाभार्थ्यांची चाचपणी करण्यासाठी मंगळवारी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

सर्वेक्षण करण्यास विरोध…

महापालिकेच्या महसूल विभागातील बिल कलेक्टर, स्वच्छता निरिक्षक, महसूल निरिक्षक आदिंसह कर्मचाऱयांची नियुक्ती सर्वेक्षणासाठी करण्यात आली होती. आश्रय कॉलनीतील प्रत्येक घरी जाऊन हक्कपत्र व आवश्यक कागदपत्रांची विचारणा करून लाभार्थ्यांची माहिती घेण्यात येत आहे. पण यावेळी आश्रय घरामध्ये रहात असलेल्या नागरिकांनी सर्वेक्षणास आक्षेप घेऊन सर्वेक्षण करण्यास विरोध दर्शविला. पण मनपाच्या अधिकाऱयांनी पोलिसांच्या मदतीने सर्वेक्षणास प्रारंभ केला. तसेच केवळ सर्वेक्षण करणार असून कुणालाही घरामधून हाकलण्यासाठी आलो नसल्याचे सांगून मनपाच्या अधिकाऱयांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले.

Related Stories

कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजकडून 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध

Amit Kulkarni

राज्योत्सव दिनाचा बससेवेवर परिणाम

Amit Kulkarni

शाळाबाहय़ मुलांचे सर्वेक्षण

Patil_p

डॉ. श्रीकृष्ण देशमुख महाराज यांची कोगनोळीस भेट

Omkar B

प्रवेश वाढले; पण सुविधांचा अभाव

Amit Kulkarni

शहीद जवान चिखलकर यांना कंग्राळी ग्रामस्थांतर्फे श्रद्धांजली

Patil_p