प्रतिनिधी/ बेळगाव
म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवर आणि मराठी भाषिकांवर पोलीस खोटे गुन्हे दाखल करतात. त्यामुळे या कार्यकर्त्यांना नाहक त्रास होतो. न्यायालयात धाव घ्यावी लागते. त्या ठिकाणी वकील द्यावा लागतो. ही बाब खर्चिक आहे. मात्र, म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी किंवा कोणताही खटला चालविण्यासाठी नेहमीच अॅड. महेश बिर्जे यांनी प्रयत्न केले आहेत. कोणत्याही प्रकारचा लोभ न ठेवता त्यांनी हे कार्य केले आहे. नुकतेच लाल-पिवळ्या रंगाच्या ध्वजाविरोधातील खटला निकालात लागला. सर्व कार्यकर्ते निर्दोष झाले. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी अॅड. महेश बिर्जे यांचा सत्कार केला.
शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर त्यांचा सत्कार करण्यात आला. 7 डिसेंबर 2017 रोजी लोकशाही मार्गाने म. ए. समितीचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. तिरंगा ध्वजाचा अवमान होत असल्याने प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोरील लाल-पिवळा हटवावा, अशी मागणी केली होती. मात्र, दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केली म्हणून कॅम्प पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.
या खटल्याचा नुकताच निकाल लागला. त्यामध्ये सर्व कार्यकर्ते निर्दोष झाले. अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर आणि अॅड. रिचमॅन रिकी यांनी या कामी परिश्रम घेतले होते. त्याबद्दल अॅड. महेश बिर्जे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी म. ए. समितीचे मनोज पावशे, नगरसेवक रवी साळुंखे, मराठी युवा मंचचे अध्यक्ष नारायण किटवाडकर, सुधीर कालकुंद्रीकर, सतीश गावडोजी, संभाजी शिंदे, दयानंद कोलवालकर आदी उपस्थित होते.
या कार्यकर्त्यांना जामीन असणाऱ्या रवी शिगीहळ्ळीकर, सचिन पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
मौखिक आरोग्य जागृतीबाबत दंततज्ञांचा गौरव