‘आप’ मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ः जातीय समीकरणांवर ठरणार निकाल
गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे खंभालिया मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. गढवी यांना या मतदारसंघात त्रिकोणी लढतीला सामोरे जावे लागणार आहे. काँग्रेसने येथे विद्यमान आमदार विक्रम मदाम यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने मुलुभाई बेरा यांना मैदानात उतरविले आहे.
‘आप’मध्ये सामील होत राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी गढवी हे एका लोकप्रिय गुजराती वृत्तवाहिनीचे निवेदक राहिले आहेत. राज्यात आम आदमी पक्षाचे मुख्य प्रचारक म्हणून त्यांनी स्थान मिळविले आहे. परंतु खंभालिया मतदारसंघातील जातीय समीकरणे त्यांच्यासाठी आव्हान ठरणार आहेत.
दिग्गज नेते आणि माजी खासदार मदाम आणि राज्याचे माजी मंत्री बेरा हे दोघेही अहीर समुदायाशी संबंधित आहेत. जातीय समीकरणानुसार अहीय समुदायाच्या मतदारांची संख्या येथे अधिक आहे. तर मुस्लीम मतदार देखील लक्षणीय प्रमाणात आहेत. मतदानात जात हा महत्त्वपूर्ण घटक ठरणार असल्याचे जाणकारांचे मानणे आहे. तर मुस्लिम मतदारांचा कल काँग्रेसच्या बाजूने असल्याचे मानले जात आहे. गढवी यांनी स्वतःला शेतकऱयाचा पुत्र ठरवत सर्वांसाठी काम करणार असल्याचा दावा केला आहे.
गढवी हे विक्रमी मतांनी विजय मिळविणार असा दावा आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तर खंभालियामध्ये मुख्य लढत भाजप अन् काँग्रेस यांच्यातच असल्याचे या दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे.
भाजपने 2007 आणि 2012 मध्ये या मतदारसंघात विजय मिळविला होता, परंतु 2014 च्या पोटनिवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून पराभव पत्करावा लागला होता. खंभालिया हा मतदारसंघ द्वारका जिल्हय़ाच्या अंतर्गत येतो. हा भाग सौराष्ट्रात मोडतो. या मतदारसंघात पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्यात दुसऱया टप्प्याच्या अंतर्गत 5 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.