एपीएमसी पोलिसांची कारवाई ः 20 लाखांचा ऐवज जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर व उपनगरांत घरफोडय़ा करणाऱया तिघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून 19 लाख 47 हजार 625 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या त्रिकुटाने शहरात 9 हून अधिक घरफोडय़ा केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी शनिवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. खाजा अस्लम ऊर्फ रफीक सैयद शेख (वय 32), इरफान खताल शेख (वय 32, दोघेही रा. सत्यसाई कॉलनी, वैभवनगर), तंजीम इस्माईल खानापुरी (वय 30, मूळचा रा. बाजारपेठ, खानापूर, सध्या रा. सिद्धेश्वरनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी नारायण बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, उपनिरीक्षक श्रीमती के. एस. नायक, त्रिवेणी नाटीकार, मृत्यूंजय मठद, साहाय्यक उपनिरीक्षक बी. के. मीटगार, दीपक सागर, शंकर कुगठोळ्ळी, सोमाप्पा करलिंगण्णावर, नामदेव लमाणी, केंपान्ना दोडमनी, गोविंद पुजारी, भरतेश अनगली, बसवराज बानसे, दयानंद गोटूर, धऱयाप्पा गेनन्नावर आदींचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.
त्यांच्याजवळून 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, 17 किलो 425 ग्रॅम चांदीचे दागिने, 1 हजार रुपये रोख रक्कम, गुन्हय़ासाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली, एक कार असा एकूण 19 लाख 47 हजार 625 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्रिकुटाला अटक करणाऱया पोलीस पथकाचे आयुक्तांनी कौतुक केले आहे.
23 मे 2022 रोजी टीव्ही सेंटर परिसरातील बालाजी शिवलिंगाप्पा सावळगी यांच्या घरी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करताना एकूण 9 गुन्हय़ांचा उलगडा झाला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.