ओटवणे प्रतिनिधी
ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे चक्क घरावरच ट्रक कलंडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सावंतवाडी बेळगाव या आंतरराज्य मार्गावरील माडखोल- धवडकी दत्त मंदिर नजीक घडली. सुदैवाने या अपघातात ट्रक चालकासह घरातील कुणीही जखमी झाले नाही. परंतु घराच्या छप्पराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कणकवली येथून सिलिका वाळूची पोती घेऊन बेळगाव येथे जात असलेला हा ट्रक धवडकी येथे आला असता चालकाला दत्त मंदिर येथील वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रक चालकाचा ताबा सुटून तो थेट अनिल कोरगावकर यांच्या घराच्या छप्पराला धडक देत हा ट्रक या घरावर एका बाजूने कलंडला. सुदैवानेच कोरगावकर कुटुंबीय या अपघातातून बचावले. मात्र या घराच्या छप्पराचे मोठे नुकसान झाले. या अपघातात या ट्रकचेही नुकसान झाले. मंगळवारी सकाळी या ट्रक मधील वाळूची पोती दुसऱ्या ट्रकमध्ये भरून मार्गस्थ करण्यात आली. त्यानंतर घरावर हा कलंडलेला ट्रक काढण्यात आला.