ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या नवले पूल परिसरातील अपघातांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे पावणे चारच्या सुमारास जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ भरधाव वेगातील ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक आणि त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगळूर महामार्गावरून एक मोठा ट्रक साताऱ्याहून पुण्याकडे येत होता. पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील ट्रक पलटी झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ट्रकचा चालक आणि त्याचा सहकारी जखमी अवस्थेत केबिनमध्ये अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अग्निशमन जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून चालकाशी संवाद साधत त्याला धीर दिला. त्यानंतर दोघांना ट्रकमधून बाहेर काढत तत्काळ उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले.
अधिक वाचा : बंगालच्या उपसागरात आणखी एक वादळ
दुचाकीस्वाराची तलावात उडी
दरम्यान, हा अपघात पाहिल्यानंतर मदतीसाठी एक दुचाकीस्वार पुढे आला. मात्र, ट्रक पेट घेत असल्याचे पाहून भीतीने त्याने तलावात उडी घेतली. त्याचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांनी त्या दुचाकीस्वारास जखमी अवस्थेत वर काढले.