8 पैकी 7 डबे रुळावरून घसरले ः 3 जणांचा मृत्यू ः 50 हून अधिक जखमी
वृत्तसंस्था/ मिसुरी
अमेरिकेच्या मिसुरीमध्ये एक रेल्वे कचऱयाने भरलेल्या ट्रकला धडकली आहे. ही धडक अधिक तीव्रतेची असल्याने रेल्वेचे डबे रुळावरून घसरले आहेत. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढू शकते अशी भीती व्यक्त होत आहे.
या रेल्वेमधून 243 जण प्रवास करत होते. तर जखमींमध्ये रेल्वेचालकासह 12 कर्मचाऱयांचा समावेश आहे. रेल्वे अन् ट्रकची टक्कर झाल्यावर 8 पैकी 7 डबे आणि दोन लोकोमोटिव्ह रुळावरून घसरले आहेत. हा ट्रक मिसुरीनजीक मेंडन येथे क्रॉसिंगवर उभा होता.
ही रेल्वे लॉस एंजिलिस येथून शिकागोच्या दिशेने जात होती. मिसूरीमध्ये ही रेल्वे कचऱयाने भरलेल्या एका ट्रकला धडकली आहे. रेल्वे क्रॉसिंगवर कुठल्याही प्रकारची रेड लाइट किंवा सुरक्षेची उपाययोजना नव्हती. मृतांमध्ये 2 प्रवासी आणि ट्रकचालकाचा समावेश असल्याची माहिती एका अधिकाऱयाने दिली आहे.
या दुर्घटनेत कमीतकमी 50 जण जखमी झाले आहेत. हा आकडा देखील वाढू शकतो असे ऍम्ब्युलन्स सर्व्हिसचे कर्मचारी एरिक मॅकेन्झी यांनी सांगितले आहे. स्थानिक प्रशासन प्रवाशांना मदत करत आहे. इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम सक्रीय झाली असून मदतीसाठी घटनास्थळी आपत्कालीन कर्मचाऱयांना तैनात करण्यात आले आहे. याचबरोबर या दुर्घटनेशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे.