Tarun Bharat

तेदेपला पुन्हा रालोआत आणण्याचा प्रयत्न

पवन कल्याण यांच्याकडून हालचाली : भाजपच्या भूमिकेकडे राहणार लक्ष

वृत्तसंस्था / विशाखापट्टणम

आंध्रप्रदेशातील जनसेनेचे प्रमुख आणि टॉलिवूड स्टार पवन कल्याण यांच्याकडून एक मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. तेलगू देसम पक्षासोबत आघाडी करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाला तयार करू असे त्यांनी म्हटले आहे. भाजप आणि तेदेपची आघाडी आंध्रप्रदेशात एक नव्या राजकीय पुनर्रचनेचा मार्ग प्रशस्त करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

एका जाहीर सभेत पवन यांच्या घोषणेवरून राज्यातील सत्तारुढ वायएसआर काँग्रेसने मात्र सडकून टीका केली आहे. तर भाजप नेतृत्वाने याप्रकरणी मौन बाळगले आहे. पवन कल्याण यांनी सत्ताविरोधी मतांमध्ये फूट न पाडण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. तसेच हे साध्य करण्यासाठी भाजप, तेदेप आणि जनसेना यांच्यात आघाडी करण्याची सूचना त्यांनी केली.

भाजपला कडवट अनुभव

जनसेना यापूर्वीच भाजपसोबत आघाडीत आहे. तेदेप 2014 प्रमाणेच भाजपसोबतचे स्वतःचे संबंध पुन्हा प्रस्थापित होतील अशी अपेक्षा करत आहे. परंतु भाजप आता तेदेपसोबत आघाडीसाठी इच्छुक नसल्याचे मानले जातेय. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तेदेप अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी भाजपसोबतची आघाडी संपुष्टात आणत स्वबळावर निवडणूक लढविली होती. तसेच भाजपवर त्यांनी अनेक आरोप केले होते.

काँग्रेससोबत आघाडी

तेदेप प्रमुखांनी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेससोबत आघाडी करत भाजपविरोधी काँगेसच्या नेतृत्वाखालील जाहीर सभांमध्ये भाग घेतला होता. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत ते जाहीर व्यासपीठांवर दिसून आले होते. तसेच नायडू यांनी भाजपच्या पराभवासाठी प्रचारही केला होता. तेदेपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रचार केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर भाजप नेतृत्वाने तेदेपसोबत पुन्हा आघाडी न करण्याचा स्वतःचा मनोदय पुन्हा व्यक्त केला आहे. तर तेदेप नेते भाजपसोबत आघाडी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधानांशी बोलणार

चंद्राबाबू नायडू देखील वायएसआर काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्यासाठी सत्ताविरोधी मतांची एकजूट राखण्याच्या बाजूने आहेत. त्यांनी अन्य पक्षांना पुरेसे प्रतिनिधित्व देत आघाडी मजबूत करण्यासाठी काही त्याग करण्याचाही प्रस्ताव मांडला आहे. पवन कल्याण यांनी हा प्रस्ताव स्वीकारून आता तेदेप आणि भाजप यांच्यात आघाडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेतृत्वासोबत याप्रकरणी विचारविनिमय करणार असल्याचे पवन यांनी म्हटले आहे.

वायएसआरकडून टीका

वायएसआर काँग्रेसचे आमदार टोपुदुर्ति प्रकाश रेड्डी यांनी आघाडीसंबंधी जनसेना प्रमुखांच्या टिप्पणींवर टीका केली आहे. पवन कल्याण यांचा तेदेप आणि भाजपला एकत्र आणण्याचा प्रयत्न पाहता ते एकटय़ाने जगनमोहन यांना हरवू शकत नसल्याची बाब स्पष्ट आहे. तेदेप आणि जनसेना या पक्षांनी एकत्र येत 2024 ची निवडणूक लढवावी असे आव्हान रेड्डी यांनी पवन कल्याण यांना दिले आहे. चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांच्या राजकीय कटानंतरही वायएसआर काँगेस राज्यात पुन्हा मोठा विजय मिळविणार असल्याचा दावा रेड्डी यांनी केला आहे. तर पुढील निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असून यात नव्या आणि तरुण चेहऱयांना 40 टक्के स्थान मिळणार असल्याची घोषणा चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.

Related Stories

उपेंद्र कुशवाह यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ

Patil_p

दुतावासातील 50 टक्के कर्मचारी कमी करा!

Patil_p

महिलांचे फोटो एडिट करत बदनामी करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक

Abhijeet Khandekar

‘बूस्टर’साठी नोंदणी सुरू, उद्यापासून ‘तिसरा डोस’

Patil_p

‘रिलायन्स’चे बाजारमूल्य 19 लाख कोटींच्या घरात

Patil_p

पंजाबमध्ये मागील 24 तासात 5,371 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar
error: Content is protected !!