फसवणूक प्रकरणी तिघा जणांना अटक : 500 च्या 473 नोटा जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
बारमध्ये खेळण्यातील नोटा खपविण्याचा प्रयत्न करणाऱया तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री घटप्रभा येथे ही घटना घडली असून यासंबंधी फसवणूक प्रकरण दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. घटप्रभा येथील एका बारमध्ये पार्टीसाठी गेलेल्या तरुणांनी पार्टी आटोपल्यानंतर बिलापोटी 500 च्या नोटा दिल्या. बारच्या व्यवस्थापकाला संशय आला. कारण या नोटांवर चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असा उल्लेख होता.
नोटांचा क्रमांक लिहिण्याच्या जागेवर ‘फुल्ल ऑफ फन’ असे लिहिलेले होते. त्यामुळे तातडीने घटप्रभा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीशैल बॅकुड व त्यांच्या सहकाऱयांनी तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 500 च्या 473 खेळण्यातील नोटा आढळून आल्या. किरण नागराज रंगरेज (रा. हंचीनाळ कॅम्प-सिंधनूर), शशिधर नारायण शेट्टी (रा. कोल्लूर), सागर कृष्णा निरंजन (रा. कारटगी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. फसवणूकप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. खेळण्यातील नोटा देऊन बार चालकाला ठकविण्याचा प्रयत्न जागरुकतेमुळे फसला आहे.
बारमध्ये खपविण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या 500 च्या नोटा हुबेहूब वाटतात. मात्र बनावट नोटांप्रमाणे या नोटांवर क्रमांक लिहिलेला नाही. लहान मुले खेळण्यासाठी या नोटांचा वापर करतात. याच नोटांचा वापर करून पार्टीचे बिल भागविण्याचा प्रयत्न करताना त्रिकुटाला अटक केली आहे.