वृत्तसंस्था/ माँटे कार्लो
विद्यमान विजेता ग्रीसच्या स्टीफानोस सित्सिपस व जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह यांनी येथे सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. कॅस्पर रुडचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
सित्सिपसने लॅस्लो डेअरचा 7-5, 7-6 (7-1) असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. चौथ्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रुडला मात्र ग्रिगोर डिमिट्रोव्हने स्पर्धेबाहेर घालवित आगेकूच केली. बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने रुडवर 6-3, 7-5 अशी मात केली. अन्य सामन्यात अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनने पहिला सेट गमविल्यानंतरही इटलीच्या लॉरेन्झो मुसेटीचा 2-6, 6-4, 6-3 असा पराभव केला. अडीच तास रंगलेल्या या चुरशीच्या लढतीनंतर श्वार्ट्झमनला प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली. सित्सिपसशी त्याची उपांत्यपूर्व लढत होईल.
द्वितीय मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने उपांत्यपूर्व फेरी गाठताना 8 बिनतोड सर्व्हिस करीत पाब्लो कॅरेनो बुस्टाचा 6-2, 7-5 असा पराभव केला. बिगरमानांकित स्पेनच्या अलेजांड्रो डेव्हिडोविच फोकिनाने पहिल्या फेरीत जोकोविचला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी त्याने डेव्हिड गॉफिनला 6-4, 6-1 असे नमवित शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. त्याची पुढील लढत टेलर फ्रिट्झशी होईल. फ्रिट्झने त्याचा दुहेरीचा साथीदार सेबॅस्टियन कोर्दाचा 7-6 (7-4), 7-5 असा पराभव केला.