इंडोनेशिया अन् पूर्व तिमोरमध्ये भूकंप
वृत्तसंस्था/ जकार्ता
पूर्व तिमार देशाच्या किनाऱयावर शुक्रवारी 6.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त समोर आलेले नसल्याचे युएस जियोलॉजिकल सर्व्हेकडून सांगण्यात आले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे त्सुनामी येऊ शकते, जी हिंदी महासागर क्षेत्राला प्रभावित करू शकते. भूकंपाचे केंद्र तिमोर बेटापासून 51.4 किलोमीटर खोलवर होते, हे ठिकाण पूर्व तिमोर आणि इंडोनेशियाच्या मधोमध येत असल्याचे युएसजीएसने म्हटले आहे.
इंडियन ओशन त्सुनामी वॉर्निंग अँड मिटिगेशन सिस्टीमने क्षेत्रात त्सुनामीचा इशारा दिला आहे. इंडोनेशियाच्या मालुकू या पूर्व प्रांतातही शुक्रवारी 6.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे.
तेथील भूगर्भीय संस्थेने त्सुनामीचा इशारा दिलेला नाही. भूकंपाचा धक्का शुक्रवारी सकाळी 9.36 वाजता जाणवला आहे. याचे केंद्र मालुकू बारात दया जिल्हय़ापासून 85 किलोमीटर अंतरावर जमिनीत 104 खोलवर होते. भूकंपाचे धक्के पूर्व नुसा तेंगारा प्रांत आणि तिमोर लेस्ते या देशातही जाणवले आहेत. भूकंपामुळे रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. परंतु कुठल्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही.