सेन्सेक्समध्ये 236 अंकांची घसरण, आयटी समभाग घसरले
वृत्तसंस्था/ मुंबई
मंगळवारी आठवडय़ाच्या दुसऱया दिवशी भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा घसरणीत असलेला दिसला. एकंदर दिवसभराच्या व्यवहारामध्ये धातू, आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रातील समभागांचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
आठवडय़ाच्या दुसऱया दिवशी मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 236 अंकांनी घसरून 54,052.61 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 89 अंकांनी घसरत 16,125.15 अंकांवर बंद झाला. जवळपास 1005 समभागांमध्ये तेजी होती तर 2220 समभाग घसरणीत होते.
यामध्ये डॉ. रेड्डीज लॅब्ज, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, नेस्ले इंडिया आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीत होते. तर डिव्हीज लॅब्ज, टेक महिंद्रा, ग्रेसीम इंडस्ट्रीज, हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि एचयुएल या कंपन्यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले. आयटी, एफएमसीजी, मेटल आणि रियल्टी निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरले होते. मंगळवारी सुरुवातीला सेन्सेक्स निर्देशांक 18 अंकांच्या तेजीसह 54307 आणि निफ्टी निर्देशांक 26 अंकांच्या तेजीसह 16,241 अंकांवर खुला झाला होता. निफ्टी निर्देशांकात ओएनजीसी, अदानी पोर्टस, टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि सनफार्मा तेजीमध्ये दिसले. वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती या कारणांमुळे जागतिक बाजारपेठच काहीशी सुस्तावलेली आहे. त्याचेच परिणाम भारतीय शेअर बाजारवरही दिसून आले. मे महिन्यामध्ये इंग्लंड आणि युरोपमधील व्यवसाय गती थंडावली होती. त्यामुळेच जागतिक व भारतीय बाजारावरही याचे परिणाम दिसले.
शेअर बाजारामध्ये मंगळवारी लॉजिस्टिक क्षेत्रातील कंपनी डेलिव्हरी लिमिटेड यांचा आयपीओ 495.20 रुपयांवर लिस्ट झाला. दुसरीकडे स्टेनलेस स्टील पाईपच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया व्हीनस पाईप अँड टय़ुब्ज यांचा आयपीओही बाजारात लिस्ट झाला. सदरचा आयपीओ 3.5 टक्के प्रिमियमसह लिस्ट झाला. रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये कमकुवत खुला झाला. तो 77.51 ते 77.56 या दरम्यान होता.