डेन्मार्कवर मात करीत ऑस्ट्रेलिया बाद फेरीत
वृत्तसंस्था /कतार
विश्वचषक स्पर्धेत बुधवारी आणखी एक धक्कादायक निकाल पहावयास मिळाला. तरीही हरणाऱया संघाने आगेकूच केली तर जिंकणाऱया संघाला स्पर्धेबाहेर पडावे लागले. विद्यमान विजेत्या फ्रान्सला टय़ुनिशियाने गट ड मधील सामन्यात 1-0 असा पराभवाचा धक्का दिला तर याच गटातील दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कचाही याच फरकाने पराभव करून 16 वर्षांच्या खंडानंतर बाद फेरीत स्थान मिळविले.
एज्युकेशन सिटी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टय़ुनिशियाने फ्रान्सला 1-0 असे चकित केले. अखेरच्या मिनिटात ऍटॉईन ग्रीझमनने फ्रान्सचा गोल नोंदवला होता. पण व्हीएआरनंतर हा गोल रद्द करण्यात आल्याने टय़ुनिशियाचा विजयही निश्चित झाला. मात्र या विजयाचा त्यांना काहीही फायदा झाला नाही.
ऑस्ट्रेलिया विजयी
ऑस्ट्रेलियानेही डेन्मार्कला 1-0 असा धक्का देत शेवटच्या सोळा संघांत स्थान मिळविले. यापूर्वी 2006 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने बाद फेरी गाठली होती. मॅथ्यू लेकीने एकमेव निर्णायक गोल केला. अल जनौब स्टेडियमवरील या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बराच काळ डेन्मार्कवर रोखले होते. 60 व्या मिनिटाला मात्र प्रतिआक्रमणात लेकीने जोरदार हल्ला चढविला आणि लो फटका मारून गोलरक्षक कॅस्पर श्मीचेलला चकवा देत गोल नोंदवला. हाचा गोल शेवटी निर्णायक ठरला. डेन्मार्कच्या प्रशिक्षकांनी आक्रमक खेळाडूंची फळी उतरवली. त्यांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण शेवटी त्यांना गोलने हुलकावणीच दिली. डेन्मार्कला या स्पर्धेत एकही गोल नोंदवता आला नाही. एक गुणासह ते तळाच्या चौथ्या स्थानावर राहिले.