56,877 दशलक्ष टन धान्याने भरलेले जहाज माघारी ः गव्हात रुबेला विषाणू असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सातत्याने वाढणारी महागाई आणि कमकुवत होत चाललेल्या चलनाला तोंड देणाऱया तुर्कस्तानने भारतीय गव्हाची खेप स्वीकारण्यास नकार दिला आहे. फाइटोसॅनिटरी चिंता असल्याचे म्हणत तुर्कस्तानने हे पाऊल उचलले आहे. फाइटोसॅनिटरी म्हणजेच वृक्ष-रोपांशी निगडित आजार.
भारतीय गव्हाच्या खेपमध्ये रुबेला विषाणू आढळून आल्याने ती नाकारण्यात आली आहे. 56,877 दशलक्ष टन गव्हाने भरलेले एमव्ही इंस अकडेनिज जहाज तुर्कस्तानच्या इस्केंडरुन बंदरावरून माघारी परतली असून 15 जूनपर्यंत हे जहाज गुजरातच्या कांडला बंदरावर पोहोचण्याची अपेक्षा असल्याचे इस्तंबूलमधील एका व्यापाऱयाने सांगितले आहे.


तुर्कस्तानच्या कृषी मंत्रालयाने गहू नाकारण्याशी निगडित प्रश्नांवर अद्याप कुठलीच भूमिका मांडलेली नाही. रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाचा पुरवठा जगभरात प्रभावित झाला असताना आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार गव्हाचा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात असताना तुर्कस्तानने हे पाऊल उचलले आहे.
तुर्कस्तानच्या या पावलामुळे भारतीय निर्यातदारांना समस्या होऊ शकते. पुढील काही दिवसांमध्ये इजिप्तसह अनेक देशांमध्ये भारतीय गव्हाची निर्यात केली जाणार आहे. भारतीय गहू तुर्कस्तानकडून नाकारण्यात आल्याने अन्य देश देखील याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करू शकतात.
इजिप्तने सुमारे 2 महिन्यांपूर्वी गुणवत्ता पडताळून पाहिल्यावरच भारताला गव्हाचा पुरवठादार म्हणून मंजुरी दिली होती. भारतीय गव्हाची गुणवत्ता तपासण्यासाठी इजिप्तचे एक शिष्टमंडळ भारतात आले होते. या शिष्टमंडळाने मध्यप्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्राचा दौरा केला होता. शिष्टमंडळाने गव्हाच्या नमुन्यांची तपासणी केली होती. इंडियन फाइटोसॅनिटरी उपाययोजनांचाही आढावा घेतला होता.
भारतातील इजिप्तचे राजदूत वाल मोहम्मद अवद हमीद देखील या शिष्टमंडळाच्या सोबत होते. भारत हा जगातील दुसऱया क्रमांकाचा गहू उत्पादक देश आह. भारताने गव्हाच्या वाढत्या देशांतर्गत किमती रोखण्याच्या उद्देशाने 13 मे रोजी त्याच्या निर्यातीवर काही अटींसह बंदी घातली होती.