वृत्तसंस्था/ अंकारा
स्वीडन आणि फिनलंड या दोन देशांनी नाटोमध्ये सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयावर तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसिप ताईप एर्दोगन हे नाटो नेत्यांशी चर्चा करीत आहेत, अशी माहिती तुर्कस्थानच्या प्रशासनाने दिली आहे. या दोन देशांना नाटोचे सदस्यत्व मिळू नये, अशी तुर्कस्थानची इच्छा असून त्यासाठी नकाराधिकार वापरण्याची एर्दोगन यांची तयारी आहे. त्यामुळे या दोन देशांच्या नाटो प्रवेशासंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्वीडन आणि फिनलंड यांनी तुर्कस्थानात गोंधळ माजवित असलेल्या कुर्दिश जमातीला पाठिंबा दिला होता. कुर्दिश गट आणि इतर काही गटांना तुर्कस्थानमध्ये दहशतवादी मानले जाते. अशा दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणारे देश नाटोमध्ये असू नयेत, अशी तुर्कस्थानची मागणी असून त्यादृष्टीने हा देश प्रयत्न करीत आहे. यासंबंधी आपण नेदरलंडचे पंतप्रधान मार्क रट यांच्याशी चर्चा केली आहे. ब्रिटिश आणि फिनलंडच्या नेतृत्वाशी चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.