सर्वोच्च न्यायालयाने कठोर कारवाई करण्यापासून रोखले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने विविध राज्यांच्या पोलिसांना खासगी वृत्तवाहिनीचे अँकर रोहित रंजन यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यापासून शुक्रवारी रोखले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा व्हिडिओ ‘चुकीच्या संदर्भाने दाखविण्या’प्रकरणी रंजन यांच्या विरोधात काही राज्यांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रंजन यांनी याप्रकरणी कठोर कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ऍटर्नी जनरल यांच्या कार्यालयाद्वारे केंद्र सरकारसह अनेक संबंधित पक्षकारांना नोटीस बजावली आहे. न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि जे.के. महेश्वरी यांच्या खंडपीठाने याचिकेवर नोटीस बजावत रंजन यांना ताब्यात घेण्याची कठोर कारवाई करता येणार नसल्याचे सांगितले आहे.
राहुल यांचा व्हिडिओ चुकीच्या संदर्भात दाखविण्याप्रकरणी अनेक राज्यांमध्ये रंजन यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी रंजन यांनी माफी देखील मागितली होती. तसेच संबंधित वृत्त कार्यक्रम मागे घेतला होता.
छत्तीसगडचे पोलीस पथक मंगळवारी उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथे रंजन यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले हेते. परंतु त्यापूर्वी नोएडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मंगळवारी रात्रीच त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती.
रंजन यांनी एका शोचे अँकरिंग केले होते. राहुल गांधी यांची वायनाडमधील स्वतःच्या कार्यालयावरील हल्ल्यासंबंधीची टिप्पणी उदयपूरमधील कन्हैयालाल यांच्या हत्येशी संबंधित असल्याचे दाखविण्यात आल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला होता.