प्रतिनिधी /बेंगळूर
उत्कंठा लागलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज शनिवारी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी शुक्रवारी ट्विटरवर ही माहिती दिली. पदवीपूर्व शिक्षण मंडळाच्या कार्यालयात बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे. www.karresults.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
यंदा 23 एप्रिल ते 18 मे या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडली होती. परीक्षेला एकूण 6,84,255 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 3,46,936 मुले व 3,37,319 मुली हजर झाल्या होत्या. कला शाखेतून 2,28,176, वाणिज्य शाखेतून 2,45,519 व विज्ञान शाखेतून 2,10,569 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेसाठी राज्यभरात 1,076 केंद्रे स्थापन करण्यात आली होती.