वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
ट्विटर या लोकप्रिय माध्यमाची मालकी मिळविल्यानंतर उद्योगपती एलॉन मस्क यांनी कर्मचारी कपातीचा धडाका लावला आहे. आतापर्यंत 50 टक्के कर्मचाऱयांना घरी पाठविण्यात आले असून आणखी कपात शक्य आहे. हे कठोर पाऊल उचलल्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. अनावश्यक कर्मचारी संख्येमुळे कंपनीला प्रतिदिन 33 कोटी रुपयांचा तोटा होत होता, असे मस्क यांचे म्हणणे आहे.
भारतात ट्विटरचे 200 च्या आसपास कर्मचारी होते. त्यांच्यापैकी बहुतेक जणांच्या हाती निरोपाचा नारळ देण्यात आला आहे. इंजिनिअरिंग, सेल्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन या विभागांमधील अनेक कर्मचाऱयांना काढून टाकण्यात आले आहे. भारतात मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभागांमधील सर्व कर्मचाऱयांना काम सोडावे लागले असून त्यामुळे बरीच नाराजी पसरली आहे.
ज्या कर्मचाऱयांना काढण्यात आले आहे त्यांना 3 महिन्यांचे वेतन देण्यात आले असून ही रक्कम नियमापेक्षा 50 टक्के जास्त आहे. त्यामुळे आम्हाला कर्मचाऱयांची चिंता नाही हा आरोप योग्य नाही. कंपनीने कर्मचारी कपातीचे पाऊल दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्याने उचलले. अन्यथा कंपनी डबघाईला येऊन सर्वच कर्मचाऱयांची हानी झाली असती., असे स्पष्ट करण्यात आले. कर्मचाऱयांमध्ये नाराजी असली तरी इलाज नव्हता, असे सांगण्यात आले.
तीन प्रकारचे ईमेल ट्विटरच्या कर्मचाऱयांना तीन प्रकारचे ईमेल देण्यात आले आहेत. ज्यांना नोकरीवरुन काढण्यात आलेले नाही, अशांसाठी एक ईमेल आहे. ज्यांना नोकरीवरुन काढण्यात आलेले आहे, त्यांच्यासाठी दुसरा ईमल पाठविण्यात आला आहे. तर ज्यांची नोकरी अधांतरी आहे, त्यांच्यासाठी तिसरा ईमेल आहे