प्रतिनिधी/ काणकोण
चावडी ते तुडल, गावडोंगरी अशी वाहतूक करणाऱया एका प्रवासी मिनी बसला तुडल येथे एका वळणावर अपघात झाला. सुदैवाने मिनी बसमधील प्रवासी सुखरूप बचावले. तुडल, गावडोंगरीच्या खराब रस्त्यामुळे हा अपघात झालेला असून रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडलेले आहेत. सततच्या पावसामुळे खड्डय़ांत साचलेल्या पाण्यामुळे हा अपघात घडला, अशी माहिती वाहनचालकाने दिली. प्रसंगावधान राखून बसचालकाने बस सांभाळली, नपेक्षा या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती, असे या बसमधील प्रवाशांनी सांगितले.
दरम्यान, काणकोण नगरपालिका क्षेत्रात देवाबाग येथे एका कारने विजेच्या खांबाला जोरदार धक्का दिल्यामुळे खांब मोडला आणि कारची मोडतोड झाली. मात्र कारमध्ये असलेले प्रवासी बचावले. मिळलेल्या माहितीनुसार सदर अपघात 17 रोजी पहाटेच्या दरम्यान घडला. या कारमध्ये चार व्यक्ती होत्या. अपघाताचे कारण समजू शकले नाही.