Tarun Bharat

जमीन हडपप्रकरणात दोघे गजाआड

अटकेतील दोघेही पुराभिलेख खात्याचे कर्मचारी : फोंडय़ातील व्यावसायिक एसआयटीच्या ताब्यात

प्रतिनिधी /पणजी

 पुराभिलेख खात्यात काम करणारे आणखी दोन कर्मचारी राज्यातील जमीन हडप प्रकरणात अडकल्याचा संशय तपासात आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय फोंडय़ातील एका व्यवसायिकासही ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत सरकारी कर्मचारीच अधिकप्रमाणात या जमीन हडपप्रकरणात सापडत असल्याने ‘कुंपणच शेत खातेय’ असा काहीसा अनुभव लोकांना येऊ लागला आहे.

राज्यातील जमीन बळकावल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) तीन जणांना अटक केली आहे. त्यापैकी दोन राज्य पुराभिलेख खात्याचे कर्मचारी असून फोंडय़ातील एका व्यावसायिकाचाही समावेश आहे. पुराभिलेख विभागात बाईंडर म्हणून काम करणारे महेश नाईक आणि रेकॉर्ड अटेंडंट असलेले धीरेश नाईक यांना कळंगुट येथील एका जमिनीचे हक्क बनावट कागदपत्रांचा वापर करून हस्तांतरित केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. फोंडय़ातील अनिल नाईक या व्यावसायिकालाही जमीन हडप प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे.

कुंपणच खाते शेत

सरकारी जमीन वाचवणे व तिचे रक्षण करणे याची जबाबदारी जेवढी सरकारची आहे, तेवढीच सरकारी सेवेत असणाऱया कर्मचाऱयांचीही आहे. शासनातील प्रत्येक घटकाने प्रमाणिकपणे सेवेला झोकून दिले तर जनतेतून त्याचे कौतुक होते. परंतु उलटपक्षी चुकीचे काम करताना आढळल्यास सरकारी खात्यांचे नाव बदनाम होते. याचा अनुभव आता पुराभिलेख या महत्त्वाच्या कार्यालयाद्वारे येत आहे.

धीरेश नाईकला दुसऱयांदा अटक

जून 2022 मध्ये देखील एसआयटीने धीरेश नाईकला आणखी एका जमीन बळकावण्याच्या प्रकरणात अटक केली होती. आता त्याच्यावर झालेली ही दुसरी कारवाई आहे.

त्रिकुट करतेय बनावट कागदपत्रे

सरकारी कर्मचारी महेश नाईक आणि धीरेश नाईक हे पुराभिलेख खात्यातील जमीन नोंदणीबाबतच्या दाखल्यांची पुस्तिका व्यावसायिक अनिल नाईक यांना नेऊन देत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यांच्या या कृतीमुळे अनेक दाखले गायब झाल्याचेही उघडकीस आले असून, हे त्रिकुट संगनमतानेच हे कृत्य करीत असल्याने बनावट दस्तावेज तयार करून देणाऱया इतर काही सरकारी नोकरांवरही पोलिसांची नजर असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.

दरम्यान, हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी महत्त्वाचा दुवा असलेला संशयित मोहम्मद सुहेलला यापूर्वीच दोनदा अटक करुन 50 हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले आहे.

ज्युलिएट फर्नांडिस यांनी दिली होती तक्रार

केणतीही पूर्वसूचना किंवा परवानगी न घेता परस्पर जमीन बळकावल्याची तक्रार कळंगुट येथील रहिवासी ज्युलिएट फर्नांडिस यांनी बार्देश मामलेदार कार्यालयात दिली होती. त्यानंतर हे प्रकरण एसआयटीकडे आल्यानंतर पथकाने फसवणूक व कटकारस्थानचा गुन्हा नोंदविला होता.

खात्यातील अधिकारीही एसआयटीच्या रडावर

राज्यातील जमीन हडप प्रकरणात पुराभिलेख खात्यातील केवळ नोकरच गुंतले असण्याची शक्यता नसून, यात मोठे अधिकारी असू शकतात, असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे या जमीन हडप प्रकरणाशी संबंधित असणाऱया अधिकाऱयांचीही पोलीस चौकशी करणार आहेत.

Related Stories

साखळी परिसरातील मतीमंद मुलांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कीटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण..!

Patil_p

मंडूर आरोग्य केंद्रात कोविड सेन्टर नको,

Omkar B

डिचोलीचे नगरसेवक निलेश टोपले यांचा भाजपप्रवेश

Patil_p

वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांचा वाढदिवस साजरा

Amit Kulkarni

राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱयांचे आझाद मैदानावर धरणे

Amit Kulkarni

खोल पंचायतीचा कचरा प्रकल्प अंतिम टप्प्यात

Amit Kulkarni