महिनाभरापूर्वी घातला होता दरोडा : सांगली जिल्हय़ातील दोघांना अटक
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या महिनाभरापूर्वी एम. के. हुबळीजवळ बोलेरो पिकअप अडवून पाच कोटी रुपये पळविण्यात आले होते. या दरोडय़ाचा जिल्हा पोलिसांनी छडा लावला आहे. सांगली जिल्हय़ातील दोघा जणांना अटक करून 2 कोटी 44 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी बुधवारी रात्री ही माहिती दिली.
श्रीकांत अरविंद कोळेकर (वय 25), संभाजी शिवाजी मेनकुदळे (वय 28) दोघेही राहणार दुधेभावी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली अशी अटक केलेल्या दोघा जणांची नावे आहेत. या टोळीतील आणखी चौघेजण फरारी असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू ठेवली आहे.
8 एप्रिल 2022 रोजी यासंबंधी बैलहोंगल पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. कोल्हापूर येथील विलास कदम यांनी फिर्याद दिली आहे. कोल्हापूरहून केरळला केए 22, डी 2333 क्रमांकाच्या बोलेरो पिकअपमधून 4 कोटी 97 लाख 30 हजार रुपये पाठविण्यात येत होते. त्यावेळी इर्टिगा कारमधून आलेल्या दरोडेखोरांनी गद्दीकरविनकोप्प व एम. के. हुबळी दरम्यान बोलेरो अडवून रक्कम लुटली होती.
बोलेरोचा चालक व क्लिनरला पिस्तूलचा धाक दाखवत ही लूट करण्यात आली होती. विलास कदम यांची कोल्हापूर व केरळमधील तलसेरी येथे सराफी पेढी आहे. कोल्हापूरहून केरळला पैसे पाठविताना बोलेरो पिकअपचा पाठलाग करून मोठी रक्कम लूटण्यात आली होती. यासंबंधी बैलहोंगल पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी बैलहोंगलचे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कटगी, पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी, कित्तूरचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन केले होते. जिल्हय़ातील वेगवेगळय़ा पोलीस स्थानकातून निवडक पोलिसांचा या पथकात समावेश करण्यात आला होता. या पथकाने दोघा जणांना अटक करून 2 कोटी 44 लाख रुपये जप्त केले.