पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील प्रकार : एक लाखाचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी /वाळपई
पिसुर्ले सत्तरी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये विजेच्या केबलची चोरी करणाऱया अमित व कमलेश (रा. उत्तर प्रदेश) दोघांना वाळपई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यासाठी वापरलेली रिक्षाही ताब्यात घेतली आहे. हा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी घडला.
याबाबतची माहिती अशी की पिसुर्ले औद्योगिक वसाहतीमध्ये एका झाडाच्या खाली रिक्षामध्ये काहीजण वीज केबल भरत असल्याची माहिती होंडा पोलीस स्थानकाला दिली. याची ताबडतोब दखल घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सदर ठिकाणी रिक्षा क्रमांक जीए-08 यू-4876यामध्ये दोन इसम वीज केबल चोरून रिक्षात भरताना दृष्टीस पडले. याची त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाही. यामुळे पोलिसांना संशय आला. या प्रकरणी दोघाही संशयिताना ताब्यात घेऊन होंडा येथील पोलीस चौकीवर आणले असता त्यांच्याकडून सदर केबलची चोरी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे एक लाखांची केबल ताब्यात घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या चोरीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
या औद्योगिक वसाहती शेजारीच जंगल आहे. चोरटे या जंगलाचा फायदा घेऊन या भागांमध्ये चोऱया करीत असतात. यामुळे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन संशयास्पद आढळणाऱया परप्रांतीयावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.