अथणी पोलिसांची कारवाई : जेवणाला बोलावून करण्यात आला खून, ‘तो’ तरुण गुगवाड येथील रहिवासी
प्रतिनिधी /बेळगाव
एका तरुणाचा खून करून करिमसुती कालव्यात मृतदेह फेकून देण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाचा केवळ चार दिवसांत अथणी पोलिसांनी छडा लावला असून एका अल्पवयीन मुलासह दोघांना अटक केली आहे. खून झालेला तरुण जत तालुक्मयातील गुगवाड येथील राहणारा होता.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी या प्रकरणाची माहिती दिली. विठ्ठल तुकाराम बन्नेण्णावर (वय 21, मूळचा रा. गुगवाड, सध्या रा. उगार बुद्रुक) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. जेवणाला बोलावून रॉडने हल्ला करून त्याच्याच दोघा मित्रांनी विठ्ठलचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
उगार बुद्रुक येथील 19 व 17 वषीय दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर केले आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकरगौडा बसनगौडर, ऐगळीचे पोलीस उपनिरीक्षक एस. एच. पवार, हवालदार एस. एम. पडसलगी, ए. ए. इरकर, एम. बी. दोडमनी, एस. एस. बबलेश्वर, एम. ए. पाटील, ए. सी. मुजावर, जे. आय. पट्टेगार, प्रशांत आलमट्टी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
अथणीतील एकंचीजवळ करिमसुती कॅनॉलमध्ये 24 जुलै रोजी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी एकंची येथील बसाप्पा होकुंडी (वय 45) यांनी ऐगळी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. बसाप्पा दुचाकीवरून चमकेरीला जाताना कॅनॉलमध्ये मृतदेह तरंगत असल्याचे त्यांनी पाहिले.
प्रथमदर्शनी त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले. मात्र मृतदेहाची ओळख पटविणेही कठीण होते. पोलिसांनी गावोगावी फिरून माहिती जमविली. अखेर करिमसुती नाल्यात आढळलेला मृतदेह विठ्ठलचा असल्याचे उघडकीस आले. तो मूळचा जत तालुक्मयातील गुगवाडचा होता. सध्या मोलमजुरीसाठी उगार बुद्रुक येथे त्याचे वास्तव्य होते. दोन तरुणांनी त्याचा काटा काढल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
जेवणाला बोलावून काढला काटा
उगार बुद्रुक येथील दोन तरुणांनी विठ्ठलला जेवणाला बोलावून घेतले. गावातच त्याला दारू पाजण्यात आली. मोटारसायकलवरून एकंचीजवळ नेण्यात आले. तेथे जेवण येणार आहे, असे सांगून त्याला कॅनॉलजवळ नेण्यात आले. तेथे पोहोचल्यानंतर रॉडने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह कॅनॉलमध्ये टाकला. खुनासाठी वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. आपल्याजवळ असलेला एक फोटो दाखवून विठ्ठल एका तरुणाला सतावत होता. सारखे पार्टी दे नाही तर हे फोटो सगळय़ांना दाखवितो, असे सांगत होता. त्यामुळेच विठ्ठलचा काटा काढल्याचे पोलीस तपासात सामोरे आले आहे. विठ्ठल दाखवत असलेला फोटो कोणाचा, याची माहिती देण्यास अधिकाऱयांनी नकार दिला आहे.