वार्ताहर/ सौंदलगा
येथील वेदगंगा नदीकाठी असणाऱ्या म्हसोबा मंदिर जवळील यमगर्णी व नांगनूर मधून येणाऱ्या ओढ्याजवळ दोन मगरी आढळून आल्याने या भागात सध्या नदीकाठचे गवत कापण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
सौंदलगा येथील शेतकरी सध्या वेदगंगा नदीकाठी येथील शेतकरी मुरली पाटील, जगदीश यादव, नंदू काळुगडे, निवृत्ती काळुगडे हे आपल्या कुटुंबासहित गवत कापण्यासाठी गेले असता त्यांना नांगनूर व यमगर्णी या गावच्या मधून आलेल्या ओढ्यासमोर नदीमध्ये दोन मगरी आढळून आल्या. त्यामध्ये एक मगर सुमारे आठ ते नऊ फुटाची आहे तर दुसरी मगर पाच फुटाची आहे. गेल्या आठ-दिवसांपासून या मगरींचे परिसरात वास्तव्य आहे. शेतीच्या पाण्याच्या मोटारी बंद झाल्यानंतर या मगरी उन्हासाठी म्हणून याठिकाणी येऊन थांबत आहेत. दोन दिवसांपूर्वी कुन्नूर येथील काहीजण मासे पकडण्यासाठी या ठिकाणी आले होते. पण या दोन मगरींना पाहताच ते परत निघून गेले. या भागातील शेतकऱ्यांना या मगरीपासून धोका पोहचू शकतो. तरी वनखात्याने या मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.