वास्केतील सीबर्ड मरिन सर्व्हिसेसला दिले होते काम
प्रतिनिधी /राय
बोरी येथील झुवारी नदीवरी जुन्या पुलाचे अवशेष तोडण्याचे काम चलू असताना काल मंगळवारी दोन कामगार बुडाले आहेत.
जुना बोरी पूल गेली कित्येक वर्षे तुटलेल्या अवस्थेत होता. या पुलाचे अवशेष बाजुला करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने वास्को येथील सीबर्ड मरिन सर्व्हिसेस या कंपनीला दिले आहे. मंगळवारी काही कामगार मंडळी त्यासाठी पुलावर काम करीत होती. पुलाचे अवशेष तोडण्याचे काम चालू असताना अवशेषाबरोबर अचानक चार कामगार खाली नदीत पडले. त्यातील दोन कामगार पोहून किनाऱयावर आले तर दोन कामगार बुडाले.
बुडालेल्या कामगारांची नावे विजयकुमार यादव (29 वर्षे, झारखंड) व छोटेलाल उराव (22, झारखंड) अशी आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच मायणा- कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे, उपनिरीक्षक विकेश हडफडकर व अन्य पोलीस कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या दोन कामगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न सायंकाळी उशिरापर्यंत चालू होता.