पुलाची शिरोली/वार्ताहर
हालोंडी ( ता हातकणंगले ) येथे रस्त्याच्या वहिवाटीवरुन दोन कुटुंबात मारामारी झाली. यामध्ये सहाजण जखमी झाले. महावीर आप्पासो पाटील, नीलाताई आप्पासो पाटील, अरुण श्रीपाल घुमाई, रूपाली महावीर पाटील, अनिता अरुण घुमाई व सुजाता सुकुमार पाटील अशी जखमींची नावे आहेत. परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही बाजूच्या नऊ जणांविरुद्ध शनिवारी रात्री अकराच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, महावीर पाटील हे शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या आजारी वडिलांना दवाखान्यात घेऊन जात होते. पण त्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यावर फरशीचे तुकडे, वाळूची पोती आणि रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने दुचाकी गाडीचे पार्किंग केलेले होते. याबाबत महावीर पाटील यांनी विचारणा केली. मात्र सुकुमार अण्णा पाटील, शितल सुकुमार पाटील, सतीश सुकुमार पाटील, सुजाता सुकुमार पाटील व पूजा शितल पाटील यांनी अंगावर धावत जाऊन शिवीगाळ करून मारहाण केली.
मारहाण करण्यासाठी वीळा, कोयता, काठी व दगडांचा वापर करण्यात आला. यामध्ये महावीर पाटील यांच्यासह सहा जण जखमी झाले. सर्व जखमींवर कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री उशिरा याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली. सुजाता पाटील यांच्या तक्रारीवरून महावीर पाटील, अरुण घुमाई, अक्षय घुमाई व सुकुमार पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.