वृत्तसंस्था/ कोझिकोडे
तुर्कीमध्ये अलीकडेच झालेल्या विश्व आर्म कुस्ती स्पर्धेत केरळ राज्यातील महिला पोलीस कर्मचारी आणि मल्ल मिनी राजूने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. विश्व आर्म कुस्ती स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक मिळविणारी पोलीस उपनिरीक्षक मिनी राजू ही भारताची पहिली मल्ल आहे.
केरळच्या मिनी राजूने 2018 साली जिल्हास्तरीय झालेल्या आर्म कुस्ती स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. सदर स्पर्धा केरळ पोलीस संघटनेतर्फे भरविण्यात आली होती. तुर्कीमध्ये झालेल्या विश्व आर्म रेसलिंग स्पर्धेत सहभागी झालेल्या 43 सदस्यांच्या भारतीय संघाचे नेतृत्व मिनी राजूकडे सोपविण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारतीय स्पर्धकांनी एकूण 13 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्यपदकांचा समावेश आहे.
कुस्ती क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी केरळची मिनी राजू हिने राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत आपला सहभाग दर्शविताना महिलांच्या 100 आणि 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत तसेच लांबउडीत पदके मिळविली आहेत. 2001 साली ती केरळ पोलीस दलात दाखल झाली. आपली सेवा बजावत तिने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपला सहभाग नियमितपणे दर्शविला.