उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्हय़ातील पुरई या ग्रामीण भागात राहणाऱया विनिता पांडे नामक महिलेने स्वतःची कल्पनाशक्ती आणि निर्धार यांच्या बळावर स्वतःसह पंचक्रोशीतील दोनशे महिलांना आर्थिकदृष्टय़ा आत्मनिर्भर बनविले आहे. या आत्मनिर्भरतेसाठी तिने चोखळलेला मार्गही अभिनव आहे.
जवळपास सर्व गावांमध्ये दूध न देणाऱया गाई किंवा म्हशी मोकाट सोडल्या जातात. याच निराधार गाई-म्हशींना आपलेसे करून विनिता यांनी स्वतःसह दोनशे महिलांना समाधानकारक रोजगाराची एक नवी संधी प्राप्त करून दिली आहे. तिच्या गोशाळेत आज आठशेहून अधिक गोवंशी पशु आहेत. त्यांचे शेण आणि मूत्र यांचा उपयोग करून विनिता पांडे यांनी एक मोठा उद्योग प्रस्थापित केला असून शेणखत तसेच किटनाशके उत्पादित करण्यास प्रारंभ केला आहे.


गाई-म्हशींच्या शेणापासून या उत्पादन केंद्रात 200 वेगवेगळी उत्पादने निर्माण केली जातात. प्रामुख्याने शेणखताची निर्मिती केली जाते. सध्या रासायनिक खतांपेक्षा शेणखताला प्रचंड मागणी आहे. शेणखतामुळे उत्पादन तर वाढतेच पण जमिनीचा कसही टिकून राहतो. रासायनिक खतांमुळे जमिनी नापीक बनण्याचा धोका असतो. तसा शेणखतामुळे नसतो. त्यामुळे ही मागणी आहे. याशिवाय गोबरगॅस, गाईच्या शेणापासून विटा व इतर उपयोगी पदार्थ यांचीही निर्मिती केली जाते. या कामामध्ये गुंतलेल्या दोनशे महिलांना आज लक्षावधी रुपयांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. स्वतः विनिता पांडे महिन्याला एक लाखाची कमाई करतात. त्यांचे उदाहरणही सर्वांसाठी आदर्श असेच मानले जात आहे.
अमृतसरच्या पवित्र मंदिरातील अमूल्य रत्ने गायब


अमृतसर येथील शिखांच्या मंदिरातील भिंतींवर नक्षीकामासाठी वापरण्यात आलेली महागडी रत्ने आणि बहुमूल्य दगड गायब झाल्याचे प्रकरण गाजत आहे. काही दिवसांपूर्वी मंदिराला प्रदक्षिणा घालणाऱया भक्तांच्या दृष्टीला ही बाब आल्यानंतर त्यांनी प्रशासनाकडे तक्रार सादर केली होती. त्यानंतर या रत्ने गायब होण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती.
या चौकशीत आता नवे सत्य समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवर पांघरुण घालण्यासाठी दरबार साहिबचे व्यवस्थापक शुलखनसिंग भंगाली यांनी बनावट प्रमाणपत्र दिले होते, असे तपासात आढळून आले आहे. गायब झालेले दगड ही रत्ने किंवा हिरे नसून ते केवळ नक्षीकाम करण्यासाठी उपयोगात आणलेले गेलेले चमकदार दगड होते, असे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मात्र, या प्रमाणपत्राला आता आव्हान देण्यात आले असून नक्षीकामासाठी वापरलेल्या वस्तू ही खरोखरीची रत्ने होती, असे अनेक भक्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून सखोल चौकशीची मागणी होत आहे. अशी अनेक रत्ने गेल्या कित्येक दिवसांपासून गायब आहेत, असेही दिसून आले आहे. मंदिरांच्या भिंतींवरील नक्षीकाम चिन्नकोट येथील कारागिरांनी केले आहे. इ. स. 880 च्या आसपास हे नक्षीकाम सुरू झाले. त्यात गोमेद, पन्ना, हकीक इत्यादी ठिकाणाहून मागवलेले हिरे व रत्ने उपयोगात आणण्यात आली, अशी नोंद आहे. ही माहिती डॉ. दविंदरपाल सिंग यांनी दिली आहे. एकंदर या रत्ने गायब होण्याच्या प्रकाराची पाळेमुळे बरीच खोलवर रुजल्याचे दिसून येत आहे.
मंगल पांडेचे वंशज करीत आहेत नवी क्रांती


1857 च्या स्वातंत्र्य युद्धातील महत्त्वाचे क्रांतीकारक म्हणून मंगल पांडे यांचे नाव घेतले जाते. या स्वातंत्र्य युद्धात ते हुतात्मा झाले होते. त्यांचे वंशज आजही कार्यरत असून त्यांनी यमुनानगर भागात व्यसनाधीनतेविरोधात कार्य सुरू केले असून नव्या क्रांतीचा पाया घातला आहे, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते.
मंगल पांडे यांच्या घराण्यातील एक महिला शीतल पांडे यांनी हे महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे. विशेषतः लहान मुलांमधील किंवा विद्यार्थीदशेतील व्यसनाधीनता अतिशय धोकादायक असते. या व्यसनांच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला मार्गावर आणणे आणि त्यांना व्यसनापासून मुक्त होण्यास साहाय्य करणे ही कामे शीतल पांडे यांनी आपल्या शिरावर घेतली आहेत. अशा मुलांना व्यसनापासून दूर न केल्यास त्यांचे पूर्ण आयुष्य बिघडून जाते, हे लक्षात आल्यानंतर पांडे यांनी यासाठी एक मोहीम उघडली. जिल्हय़ाचे एसपी कमलदीप गोयल यांच्या सहकार्याने त्या आपले उत्तरदायित्व पार पाडत आहेत. राज्य सरकारनेही मुलांना नशामुक्त करण्यासाठी कार्यक्रम राबविला आहे. या कार्यक्रमात शीतल पांडे यांचा पुढाकार असतो. गेल्या दोन वर्षात शेकडो विद्यार्थ्यांना नशामुक्त करण्यात त्यांनी यश मिळविले आहे. आता हे विद्यार्थी विद्याभ्यासाकडे लक्ष देत असून आपल्या जीवनात नवा प्रकाश आल्याचा अनुभव ते इतरांना सांगतात.
ज्या बँकेत सुरक्षारक्षक त्याच बँकेत व्यवस्थापक


पंजाबमधील लुधियाना जिल्हय़ातील परमजित सिंह मठारू यांची ही संघर्ष कहाणी आहे. परमजित सिंह हे अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना 13 वर्षांपूर्वी एका बँकेत सिक्युरिटी गार्डची नोकरी पत्करावी लागली. तथापि, त्यांनी हे काम हलके मानले नाही. तसेच काम करत असताना शिक्षणही सोडले नाही. आज याच बँकेत ते व्यवस्थापक म्हणून काम पाहात आहेत.
परमजित सिंह दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर 1982 मध्ये भारतीय सेनेत भरती झाले. त्यांनी 21 वर्षे हवालदार या पदावर काम केले. 2003 मध्ये सेनेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना परिवाराचे पालनपोषण करण्यासाठी बँकेत नोकरी करावी लागली. सेनेत सेवा बजावल्यामुळे त्यांना पेन्शन मिळत होती, तथापि ती मोठय़ा परिवाराचे पालनपोषण करण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे बँकेत सिक्युरिटी गार्डची नोकरी त्यांनी पत्करली. मूळचा जिद्दी स्वभाव आणि कष्ट करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण करून पुढे बँकेच्या परीक्षा दिल्या. नंतर बँकेमध्ये क्लार्कची नोकरी मिळाली. पुन्हा वरच्या परीक्षा देऊन त्यांनी व्यवस्थापक बनण्यापर्यंत मजल मारली. त्यांच्या या यशामुळे पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे.