पुनीत रंजन, राजेश सुब्रमण्यम यांचा निर्यात परिषदेत समावेश
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निर्यात परिषदेवर भारतीय वंशाच्या दोन व्यापार तज्ञांची नियुक्ती केली आहे. पुनीत रंजन आणि राजेश सुब्रमण्यम अशी त्यांची नावे आहेत. निर्यात परिषद (एक्स्पोर्ट कौन्सिल) ही आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक बाबी हाताळणारी सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी संस्था असल्याने दोघांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पुनीत आणि राजेश यांच्या नामांकनांची घोषणा व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यापूर्वी बायडेन यांनी भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. ‘निर्यात परिषद’मध्ये फक्त व्यापार तज्ञांचा समावेश केला जातो. ही परिषद व्यवसाय, उद्योग, शेती, कामगार आणि सरकारी क्षेत्राशी संबंधित असते. या परिषदेवर वर्णी लावलेले मान्यवर तज्ञ सरकारसाठी व्यापार धोरणे बनवतात. तसेच सरकारची धोरणे किती प्रभावी ठरतात यावर देखरेखही ठेवत असतात. याशिवाय ते वेगवेगळय़ा व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आणि देशांना व्यापार वाढीसाठी अमेरिकन व्यापाराला भेडसावणाऱया समस्यांवर उपायही सुचवत असतात.