वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या दोन आंतरराष्ट्रीय चॅलेंजर्स बॅडमिंटन स्पर्धांचे यजमानपद भारत भूषविणार आहे. त्याचप्रमाणे 2028 च्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी आतापासूनच अखिल भरतीय बॅडमिंटन संघटनेने पूर्वतयारीला प्रारंभ केला आहे. 11 वर्षांखालील वयोगटासाठी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आणि ठराविक मानधन देत 30 प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय फेडरेशनच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
अलिकडेच भारताने आंतरराष्ट्रीय थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून नवा इतिहास घडविल्याने अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने हा माहोल कायम राहील, असा विश्वास या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या दोन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजर्स स्पर्धा भारतात होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव संजय मिश्रा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करणाऱया भारतीय बॅडमिंटनपटूंचे खास कौतुक या बैठकीत करण्यात आले असून या कामगिरीमुळे भारतीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षीच्या बॅडमिंटन हंगामामध्ये एकूण 31 आंतरराष्ट्रीय चॅलेंजर्स बॅडमिंटन स्पर्धा घेतल्या जातात. आता 2022 च्या हंगामात यापैकी दोन स्पर्धा भारतात होणार आहेत. पहिली स्पर्धा 11 ते 16 ऑक्टोबर बेंगळूरमध्ये खेळविली जाणार आहे. याशिवाय विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूरवरील तीन स्पर्धा भारतात होणार आहेत. ओडिशा सुपर 100, सय्यद मोदी 300 आणि इंडिया खुली सुपर 500 स्पर्धा भारतात होणार आहेत. देशातील सुमारे 40-45 बॅडमिंटनपटू युरोप तसेच विदेशातील इतर ठिकाणी होणाऱया आंतरराष्ट्रीय चॅलेंजर्स बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होत असून प्रत्येकाला सुमारे 2-4 लाख रूपये खर्च करावे लागतात. पॅरीस ऑलिंपिक स्पर्धा आता दोन वर्षांवर येवून ठेपली आहे. त्यानंतर म्हणजे 2028 ची ऑलिंपिक स्पर्धा दृष्टीसमोर ठेवून अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनने सुमारे 30 नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती मानधन करारानुसार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षकांना 50 हजार ते दोन लाखापर्यंत मानधन दिले जाईल. देशातील हैदराबाद आणि बेंगळूर या राष्ट्रीय केंद्रामध्ये प्रशिक्षकांसाठी महिन्यांतून एकदा प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाईल, असे फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.