विद्यार्थ्यांसह प्रवाशांना नाहक त्रास, वारंवार बंद पडणाऱया बसेसकडे लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी /कुंभारजुवे
सांतइस्तेव्ह पंचायत क्षेत्रात काल मंगळवारी 26 रोजी सकाळी दोन कंदब बसेस बंद पडल्या. जीए-03 एक्स 0469 ही कंदब बस करपीन येथे बंद पडली तर कुपा ते पणजी प्रवासी वाहतूक करणारी जीए-03 एक्स 0466 ही कंदब बस टोंकवाडा येथे वळणावर बंद पडली. यामुळे नियमित प्रवास करणाऱया प्रवाशांचे तसेच शाळेत जाणाऱया विद्यार्थ्यांचे हाल झाले.
कदंब बसेसचे मेंटनन्स वेळेवर होत नसल्याने अनेक ठिकाणी बसेस रस्त्यावरच बंद पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व प्रवाशांनी व्यक्त केली.
एकाच दिवशी एकाच पंचायत क्षेत्रात दोन कदंब बसेस नादुरुस्त होऊन बंद पडण्याचे प्रकार घडल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांचे नाहक हाल झाले. करपीन येथे दुसरी कदंब बस बोलावून नंतर विद्यार्थ्यांना हायस्कूलला पणजीला नेण्यात आले. कदंब परिवहन मंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी या प्रकरणी लक्ष घालून बसेस रस्त्यावर बंद पडण्याचे प्रकार थांबवून, प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप बंद करावा अशी मागणी होत आहे.